मुंबई : मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या (कार्यकारी सहाय्यक) भरतीसाठी दहावीची आणि पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याची अट मंगळवारी (१० सप्टेंबर) मागे घेण्यात आली. सुधारित अर्हता जाहीर करून नवी भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी घोषणा महापालिकेने केली आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याच्या अटीविरोधात विविध स्तरांतून आलेल्या सूचना आणि मागण्यांचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्याच्या या अटीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, आम आदमी पक्षाने विरोध केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ही अट रद्द करण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिले होते. या अटीमुळे राज्यातील पाच ते साडेपाच लाख उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहत असल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केली होती.
पालिकेत ‘कार्यकारी सहाय्यक’ (पूर्वीचे पदनाम : लिपीक) संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या जागांसाठी २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. ९ सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
या पदासाठीच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे.
पालिका आयुक्तांचे निर्देश
आधी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत म्हटले होते की, ‘उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.' या शैक्षणिक अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकण्यात यावी, अशी सूचना व मागणी विविध स्तरांतून झाली. त्या सर्वांचा विचार करून अर्हतेतील 'प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
कार्यवाही सुरू
निर्देशानुसार, महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करुन त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करुन त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत देखील उचित तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कार्यवाही येत्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करुन पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल.