Mumbai : स्थायी, सुधार समितीची जबाबदारी कोणाकडे? फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक

मुंबई महापालिकेच्या तिजोरी असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची निवड होण्याची चर्चा असून सुधार समितीवर अनुभवी चेहरा देण्याबाबत भाजपची हालचाल सुरु आहे.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या तिजोरी असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची निवड होण्याची चर्चा असून सुधार समितीवर अनुभवी चेहरा देण्याबाबत भाजपची हालचाल सुरु आहे.

शिक्षण, स्थाय समिती अध्यक्ष पदाची निवडणूक २० फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर सुधार समिती अध्यक्ष पदाची निवडणूक तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महापौर निवडीनंतर पुढील समितीच्या निवडणुकीच्या महापौर तारखा जाहीर करणार आहेत. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती ही महत्वपूर्ण समिती आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदी विराजमान होण्याची अनेक नगरसेवकांची इच्छा असते. स्थायी समितीत प्रभाकर शिंदे यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. सुधार समिती ही विशेषतः शहरातील रस्ते, विकास कामे आणि नागरी सुधारणांशी संबंधित बाबींवर निर्णय घेणारी एक महत्त्वाची वैधानिक समिती आहे. या समितीत २६ सदस्य असतात. पालिका प्रशासनाचे प्रस्ताव, सुधारणा सूचना आणि विकास कामांना मंजुरी देणे हे तिचे प्रमुख कार्य आहे. स्थायी समितीत एकूण २६ सदस्य असून त्यामध्ये भाजपच्या वाट्याला १० सदस्य, तर शिवसेना उबाठा पक्षाचे आठ सदस्य असतील. सुधार समितीचेही २६ सदस्य असून स्थायी समितीप्रमाणेच सूत्र लागू होईल आणि याच दोन्ही पक्षांचे वर्चस्व राहील.

शिंदे गटाला वाट्याला येणारे सदस्य कमी आहे. मात्र संख्याबळ वाढावे यासाठी भाजपबरोबरच शिवसेना शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाला दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दर्शविला असून सहयोगी गट स्थापन करण्याच्या हालचाली आहेत. नंतर भाजपला ते पाठिंबा देतील. शिक्षण समितीतही भाजप आणि शिवसेना उबाठाचे सदस्य जास्त असून शिंदे गटासह अन्य पक्षाच्या वाट्याला कमी सदस्य येत आहे. त्यामुळे सदस्य संख्या वाढवण्यासाठी महायुतीचा खटाटोप सुरू आहे.

...अशी होणार निवडणूक

स्थायी समितीसह शिक्षण समिती अध्यक्षाच्या निवडणुका २० फेब्रुवारीला घेण्याचे नियोजन महापालिका करत आहे. २३ किंवा २४ फेब्रुवारीला सुधार समिती अध्यक्षपदासाठी निवडणुकांचे नियोजन होत आहे. ११ फेब्रुवारीला महापौर पदासाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तीन ते चार दिवसांनी गट नेते, समिती सदस्यांची नावे घोषित केली जातील.

logo
marathi.freepressjournal.in