Mumbai : 'स्थायी'च्या सभागृहात २० हजारांची चोरी; ठाकरे सेनेच्या नगरसेविकेचा आरोप 

पालिकेच्या इतिहासात नगरसेवकाच्या पैशाची पहिल्यांदाच चोरी झाल्याचा आरोप झाल्यामुळे...
'स्थायी'च्या सभागृहात वीस हजारांची चोरी; ठाकरे सेनेच्या नगरसेविकेचा आरोप 
'स्थायी'च्या सभागृहात वीस हजारांची चोरी; ठाकरे सेनेच्या नगरसेविकेचा आरोप 
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेची सर्वात महत्त्वाची स्थायी समितीच्या सभागृहात २० हजार रुपये चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांनी हा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती महापौर रितू तावडे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवार दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली होती. सभा संपल्यानंतर पार्श्वगायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना, शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका समिती सदस्या लक्ष्मी भाटिया दाखल झाल्या. उशिराने सभागृहात झालेल्या भाटिया थोडावेळ सभागृहात बसल्यानंतर काही वेळात बैठक संपली. त्यामुळे सर्व सदस्य जेवण करण्यासाठी सभागृहाला लागून असलेल्या दालनात गेले. त्यांच्यासोबत भाटियाही आपली पर्स सभेच्या टेबलावर ठेऊन जेवणासाठी गेल्या.

जेवण झाल्यानंतर त्या परत सभागृहात आल्या. यावेळी त्यांच्या पर्सची चेन उघडी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पर्समधील वस्तूंची तपासणी केली असता, २० हजार रुपये नसल्याचे दिसून आले. आपले पैसे चोरीला गेल्याची तक्रार घेऊन भाटिया स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे गेल्या यावेळी शिंदे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. शिंदे यांनी भाटिया यांचे म्हणणे ऐकून घेऊन, सचिव विभागाला चौकशीचे निर्देश दिले.

दरम्यान आपले पैसे सभागृहात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी चोरल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपामुळे गेल्या कित्येक वर्षापासून स्थायी समितीचे कामकाज सांभाळणाऱ्या सचिव विभागातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. 

पैसे चोरले की पडले..!

पैसे चोरले की, पडले याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेच्या इतिहासात नगरसेवकाच्या पैशाची पहिल्यांदाच चोरी झाल्याचा आरोप झाल्यामुळे महापालिकेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी या चोरीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in