

मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारा विरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे. महापालिकेने बजावलेल्या दुसऱ्या कारणे दाखवा नोटीसलाही कंत्राटदाराने केराची टोपली दाखवली आहे. अखेर त्याचा परवाना स्थगित केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला मुंबई महापालिकेच्या कोणत्याही नव्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
२ जुलै रोजी खैरानी रोड परिसरात मलनिस्सारण प्रचालन विभागामार्फत मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना असलम इसाक शेख हे मोबाईलवर बोलत असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल वॉर्डच्या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. तसेच सुरक्षेतील हलगर्जीपणासाठी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही दिले होते.
प्रशासकीय कारवाई अंतिम टप्प्यात
महापालिकेने या प्रकरणात सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबल्याचे स्पष्ट केले असून, चौकशी आणि प्रशासकीय कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.