
मुंबई : मुंबईतील रस्ते आता सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही कालावधीत स्वच्छ करण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यावरील धुळीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे प्रशासन दिवसातून दोन वेळा रस्ते स्वच्छ करण्याचा विचार करीत आहे.
मुंबईतील लोकसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. दररोज मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागावर आहे. पहाटे साडेसहा वाजता कामाला सुरुवात करून सुमारे २८०० किमी लांबीचे रस्ते व गल्ल्या पालिकेचे सफाई कामगार स्वच्छ करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईत विकासकामे, बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. यामुळे रस्त्यावर धुळीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने आता सर्व विभागांमध्ये दिवसातून दोन वेळा रस्ते झाडण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
‘स्वच्छता उपविधी’ मसुद्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती
मुंबई : मुंबई पालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २०२५ चा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मसुद्याबाबत नागरिकांनी ३१ मे २०२५ पर्यंत सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहे. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदलानुसार योग्य तो आढावा घेऊन नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मसुदा उपविधी घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केले आहेत.
महिन्याकरिता पालिका खर्चणार १९ कोटी
संध्याकाळी रस्ते स्वच्छ करण्यासाठी मुंबई महापालिका कंत्राटी पद्धतीने सेवा घेणार आहे. या कामासाठी एका महिन्याकरिता पालिकेला १९ कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. बांधकामाशी संबंधित वाहनांची ये-जा रस्त्यावरून सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ, माती जमा होते. वाहनांच्या वर्दळीमुळे ही धूळ वातावरणात उडत असते. त्यामुळे प्रदूषण वाढते. यावर उपाय म्हणून दोन वेळा रस्ते स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.