
विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना मानधनावर समाधान मानावे लागत आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी संख्येत वाढ झाली असली तरी शिक्षकांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मात्र शिक्षकांची रिक्त पदे भरणे शक्य होत नसल्याने १५० रुपये प्रति तास मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण विभागामार्फत एकूण २४३ महापालिकेच्या माध्यमिक शाळा असून शैक्षणिक वर्ष २०२२ पासून ‘एकच लक्ष्य, एक लक्ष’मुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढलेले आहेत. सध्या मुंबई महापालिकेच्या शाळांत ४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून त्या तुलनेने शिक्षकांची संख्या अपुरी पडू लागली आहे.
शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरणे आवश्यक असली तरी या नियमित भरती प्रक्रियेस साधारण ६ ते ७ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. पालिका आयुक्तांच्या मंजुरीने मुख्याध्यापकांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याबाबत १९ ऑक्टोबर, २०१९ रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार मुख्याध्यापकांमार्फत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करता येईल. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दीर्घ मुदत रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या जागी किंवा रिक्त जागी आवश्यक असलेले शिक्षक तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सहा तासांची ड्युटी
माध्यमिक शाळांमधील १५० शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी प्रति तास दीडशे रुपयांच्या मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये शिक्षकांना केवळ सहा तासच सेवा बजावता येणार. प्रति तास १५० रुपये याप्रमाणे महिन्याला २२ हजार ५०० मानधनावर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.