
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार याद्यांच्या विशेष पूर्वतयारीसाठी मुंबई पालिकेतील शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी निवडणुकीशी संबंधित कामे ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयात रूजू होण्याची आवश्यकता नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर वा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले होते. मुंबई पालिका आयुक्त यांनी, मुंबई शहर जिल्हा तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश दिले होते. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांसाठीदेखील शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून वेळोवेळी जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच धर्तीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
मूळ कार्यालयातून कार्यमुक्त होण्याची गरज नाही
नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांनी मूळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता त्यांनी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ऑनलाइन पद्धतीने निवडणुकीचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात रूजू होण्याची गरज नाही. तसेच, या कामकाजासाठी आयोगाच्या नियमांप्रमाणे मानधन दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.