
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयामधील शंभर वर्षांचा वारसा असणारे आणि स्वातंत्र्यलढ्यातील महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अधिष्ठाता निवास पाडून नवी इमारत बांधण्याचा डाव पालिका प्रशासनाने आखला आहे. यामुळे पालिकेची ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू नष्ट होणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू न पाडता स्ट्रक्चरल ऑडिट करून डागडुजी करावी आणि ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. हा बंगला तोडल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पालिकेचे केईएम रुग्णालय मुंबईत गेली सुमारे १०० वर्षे रुग्णसेवेचे काम करत आहे. या ठिकाणी केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयाचा बांधकामाचा वारसा अगदी इंग्रज राजवटीपासूनचा आहे. या रुग्णालयांतर्गत असलेला वैद्यकीय अधिक्षक (डीन) बंगला हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. या वास्तूची निगा व डागडुजी अजूनही पालिकेच्या अखत्यारित असून इंग्रज राजवटीपासून ऐतिहासिक परंपरा जपणारी ही स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू आहे. महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल आदींसारखे ‘स्वातंत्र्य सैनिक ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान या वास्तूत वास्तव्यास होते. त्यामुळे या बंगल्याचे संवर्धन करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र देऊन बंगला न पाडता जतन करावा, अशी मागणी केली आहे.
धोकादायक इमारती तोडून डॉक्टर निवासस्थाने बनवा
चार वर्षांपूर्वी रुग्णालय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून केईएममधील काही इमारती सी-१ आणि सी-२ कॅटेगरीमध्ये असून धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. जर प्रशासनाला डॉक्टरांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करावयाची असेल तर धोकादायक इमारती पाडून या ठिकाणी नवे टॉवर बांधून निवास व्यवस्था करा, अशी मागणीही पडवळ यांनी केली आहे.
बंगला तोडण्याचा अट्टाहास कशासाठी?
टाटा हॉस्पिटलसमोरील परिसरात केईएमची स्टाफ क्वॉटर्स आहे, ती तोडूनही त्या ठिकाणी स्टाफसाठी तसेच डॉक्टरांसाठी निवासस्थान बनविण्याचा पर्याय खुला आहे. यावर प्रशासनाने कामदेखील चालू केले होते. परंतु तो प्रस्तावदेखील बासनात गुंडाळला असल्याचे पडवळ यांनी उघड केले असून ऐतिहासिक बंगला तोडण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवालही पडवळ यांनी केला आहे. पुढील वर्षी केईएम शतक महोत्सवी वर्ष साजरे करणार असल्याने बंगल्याचा वारसा जपावा, असेही त्यांनी म्हटले आहे.