आज 'मेगा बजेट'! सुविधांचा वर्षाव, कोट्यवधी रुपयांची तरतूद ; दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहाचे दरवाजे उघडणार

आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा सन २०२४-२५ सालचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात येणार आहे.
आज 'मेगा बजेट'! सुविधांचा वर्षाव, कोट्यवधी रुपयांची तरतूद ; दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहाचे दरवाजे उघडणार

मुंबई : आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा सन २०२४-२५ सालचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात येणार आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका तसेच गेली अनेक वर्षे लांबणीवर पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुविधांचा वर्षांव करणारे हे ‘मेगा बजेट’ असणार आहे. दरम्यान, तब्बल ३९ वर्षांनंतर प्रशासक म्हणून दुसऱ्यांदा पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. ऐतिहासिक ओळख असलेल्या सभागृहाचे दरवाजे शुक्रवारी पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उघडणार असल्याने सभागृहाची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू आहे.

गेल्या वर्षी ४ फेब्रुवारी रोजी ५२ हजार ६१९.०७ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र यंदा आगामी लोकसभा, विधानसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर २०२४-२५ चा फुगीर अर्थसंकल्प सादर होणार, अशी चर्चा पालिकेत सुरू आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे, सुरळीत पाणीपुरवठा यासाठी जलवाहिन्यांची दुरुस्ती व बदलणे, वर्सोवा-दहिसर-भाईंदर कोस्टल रोड, मुलुंड लिंक रोड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, शाळा आणि रुग्णालयांची दुरुस्ती आदी मोठे प्रकल्प मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत.

मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळणारे पालिकेचे उत्त्पन्न घटले आहे. तसेच जीएसटीपोटी राज्य सरकारकडून मिळणारी रक्कमही थकली आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा त्यात घट झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला खर्चाचा ताळमेळ साधण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. राज्य सरकारकडून जीएसटीची जवळपास १० हजार कोटी इतकी मोठी रक्कम अद्याप पालिकेला मिळाली नाही. त्यामुळे खर्चाचे गणित मांडण्यासाठी नव्या बजेटमध्ये पालिकेच्या ठेवींना हात घालावा लागणार आहे. सध्या मुंबई महापालिकेकडे फिक्स डिपॉझिटच्या रूपात ८६ हजार ४०१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यामुळे सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिका मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासह प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काय उपाययोजना करणार, याकडे मुंबईचे लक्ष लागले आहे.

असा होणार सादर अर्थसंकल्प!

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे दुपारी १२ वाजता शिक्षण खात्याचे बजेट प्रशासक तथा आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सादर करतील. तर दुपारी १ वाजता अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आयुक्तांना अर्थसंकल्पीय अंदाज सादर करतील.

सभागृहाची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू

७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि ८ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासक म्हणून डॉ. इक्बालसिंह चहल कारभार चालवत आहेत. ८ मार्चपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आल्याने सभागृहाचे दरवाजे बंद आहेत. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पावेळी सभागृह उघडण्यात आले होते. तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार वितरणासाठी सभागृह उघडले होते. त्यानंतर शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सभागृहाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सभागृहाची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in