

मुंबई : अंधेरी येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात बेकायदा लॉजिंग अँड बोर्डिंग चालवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी ५० हून अधिक खोल्या या खेळाडूंना न देता त्या खोल्यांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने मुंबई महापालिकेने चौकशीचे हत्यार उपसले आहे. लवकरात लवकर चौकशी अहवाल महापौर, आयुक्त व संबंधित विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश जारी केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
मुंबईकरांना क्रीडा व सांस्कृतिक
सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अंधेरी पश्चिम येथे १९८८ मध्ये शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल उभारले आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या वतीने शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल चालवण्यात येते. प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा संकुलात क्रीडा विषयक विविध सोयीसुविधा नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येत असतात.
या संकुलाचे व्यवस्थापन व परिरक्षण 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान' या मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक न्यासाकडे सोपविण्यात आले आहे. या संकुलात क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जलतरण तलाव, खुले मैदान असे एकूण तीन महत्त्वाचे विभाग आहेत. त्याचबरोबर या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्यायामशाळा, कार्डिओ व्यायामशाळा, महिलांसाठी विनामूल्य कराटे प्रशिक्षण वर्ग, जिम्नॅस्टिक, स्केटींग, एरोबिक्स, योग, टेनिस, नृत्य, चित्रकला आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हा ऑलिम्पिक दर्जाचा आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून क्रिडा संकुलात अशाप्रकारे गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येताच महापौर रितू तावडे यांनी कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या गंभीर प्रकरणाची चौकशी करुन लवकरात लवकर अहवाल महापौर, आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना सादर करणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नाट्यगृह व थिएटर उभारणीची मागणी !
शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात येथील प्रस्तावित एका जागेवर नाटक आणि सिनेमागृह उपयुक्त ठरेल. त्यामुळे येथे भव्य असे मल्टिपर्पज नाट्यगृह उभारावे आणि त्याला गती द्यावी, अशी मागणी आमदार अमित साटम यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. सिनेमागृह प्रामुख्याने मराठी चित्रपटांसाठी आरक्षित असेल, अशी चर्चा बैठकीत झाली.
खोल्यांचे ऑनलाईन बुकिंग?
या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेत खेळाडूंसाठी ५५ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र या खोल्या खेळाडूंसाठी न ठेवता त्या खोल्यांचा वापर बेकायदा लॉजिंग अँड बोर्डिंग साठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या गंभीर प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अमित साटम, महापौर रितू तावडे, महापालिकेचे अधिकाऱ्यांची नुकतीच बैठकही संपन्न झाली. ऑनलाईन बुकिंग घेत स्वस्त दरात खोल्या उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे लोकप्रतिनिधींनी बैठकीत मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले.