

मुंबई : परळ येथील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या डॉ. शिरोडकर मंडईचा नव्याने पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून तळमजला अधिक ४८ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. यात मंडई, पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे, फायर फायटिंग सिस्टम अशा अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २९७ कोटी ९२ लाख रुपये खर्च करणार आहे. बुधवार, २४ जूनला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या मालकीची ९२ मंडई असून शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या कामातून कंत्राटदाराने पळ काढला. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून आता नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
परळ येथील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या डॉ. शिरोडकर मंडईच्या भूखंडाचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी महापालिका मंडई आणि कर्मचारी निवासस्थाने बांधण्यासाठी २०१८ साली कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. मात्र, त्या कंत्राटदाराने काही काळानंतर पुढील काम करण्यास असमर्थता दर्शवली.
नव्या कंत्राटदाराची नेमणूक
पूर्वी २१ मजल्याचे बांधकाम केले जाणार होते, आता त्यासोबतर ४८ मजल्याची उत्तुंग इमारतही बांधली जाणार आहे. त्यामुळे या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पातील सद्यस्थितीतील इमारतीमधील उर्वरित कामे पूर्ण करणे व तिचे २१ मजल्यांपर्यंतचे बांधकाम करणे आणि उर्वरित रिकाम्या भूखंडावर जुन्या इमारतीशी संलग्न नवी इमारत तळघरासह ४८ मजल्यांपर्यंत बांधकाम करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यात आला आहे.
उणे १५.२९ दराने बोली
मागवलेल्या निविदांमध्ये तीन कंपन्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये उणे १५.२९ दराने बोली लावणारी कुणाल-हिराणी ही संयुक्त भागीदारातील कंपनीची निविड करण्यात आली आहे. यामध्ये मूळ कंत्राट २३९.५० कोटी रुपये आणि विविध करांसह २९७.९२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कुणाल स्ट्र्क्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आजवर गांधीनगर, ओदिशा-भुवनेश्वर, दमण इत्यादी ठिकाणी कामे केली आहे.