चायनीज, वडापावच्या गाड्या BMC च्या रडारवर; बेकायदा स्टॉल लावणाऱ्यांवर धडक कारवाई, पावसाळी आजार रोखण्यासाठी पुढाकार

कुठल्याही खाद्यपदार्थांचा बेकायदा स्टॉल लावणाऱ्यांवर आता धडक कारवाई करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजतादरम्यान पथकाकडून...
चायनीज, वडापावच्या गाड्या BMC च्या रडारवर; बेकायदा स्टॉल लावणाऱ्यांवर धडक कारवाई, पावसाळी आजार रोखण्यासाठी पुढाकार

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्या रडारवर बेकायदा चायनीज पदार्थ विक्री करणारे, वडापावचे स्टॉल लावणारे आले आहेत. कुठल्याही खाद्यपदार्थांचा बेकायदा स्टॉल लावणाऱ्यांवर आता धडक कारवाई करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजतादरम्यान पथकाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या सात परिमंडळातील पथक आपल्या परिमंडळात कारवाई न करता शेजारील परिमंडळात जाऊन कारवाई करणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने होणारे आजार रोखण्यासाठी आता मुंबईतील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

यात फुटपाथ, स्टेशन परिसरातील बेकायदा स्टॉलवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या सात परिमंडळात पथक स्थापन करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पथक परिमंडळ दोनमध्ये कारवाई करणार आहे. यामुळे बेकायदा स्टॉल लावणाऱ्यांना पळण्याची संधी मिळणार नाही. विशेष म्हणजे, हे पथक संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत कारवाई करणार असल्याचे दिघावकर म्हणाले.

या अनधिकृत विक्रेत्यांकडून वापरले जाणारे खाद्यपदार्थांचे ट्रक, गॅस सिलिंडर आणि इतर उपकरणे जप्त करण्याची बीएमसीची योजना आहे. जप्त केलेल्या वस्तू एफ उत्तर विभाग, माटुंगा येथील नियुक्त गोदामात साठवल्या जातील आणि विक्रेत्यांना त्यांचा माल परत मिळवण्यासाठी दंड भरावा लागेल. २०२१ पासून ११,८११ हून अधिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत आणि ते त्यांच्या संबंधित कंपन्यांना परत करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in