

मुंबई : पापड, कुरडई, लोणचे, मेथकूट, तिळकूट, डांगर, सांडगे, सुक्की मच्छी आदी महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत १० व १२ मे रोजी वाळवण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे 'वाळवण महोत्सव २०२६ : सुगंध उन्हाळ्याचा' या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १२ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) हा महोत्सव भरवण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक व घरगुती खाद्यपदार्थांचा आस्वाद मुंबईकरांना या महोत्सवातून घेता येणार आहे.
शेवया, पापड, कुरडई, लोणचे, मेथकूट, तिळकूट, डांगर, सांडगे, सुक्की मच्छी
महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध साठवणीच्या खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येणार आहे. यामध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणचे, मेथकूट, तिळकूट, डांगर, सांडगे, सुक्की मच्छी, विविध मसाले आदी पदार्थांचा समावेश असणार आहे. या महोत्सवात 'टेस्टिंग काऊंटर' ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बचत गटांना प्रोत्साहन
या महोत्सवात महिला उद्योजकता चालना देण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपरिक उन्हाळी खाद्यसंस्कृतीचा अनुभव नागरिकांना मिळावा या उद्देशाने महोत्सवाला भेट घावी, असे आवाहन मीनल तुर्डे, संचालक (नियोजन) डॉ. प्रवी जोधकर यांनी केले आहे.
पारंपरिक खाद्यपदार्थांचे विशेष आकर्षण
गहू, तांदूळ, नाचणी आणि वाटाण्यांपासून तयार करण्यात आलेल्या कुरडई व पापड, तांदूळ केरी लोणचे, लिंब लोणचे, चविष्ट सांडगे आणि सांडगी मिरची, घरगुती मसाले तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ हे महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. ही चव थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.