गल्लीबोळातील परिसर होणार चकाचक; स्वच्छतेसाठी व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्स

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.
गल्लीबोळातील परिसर होणार चकाचक; स्वच्छतेसाठी व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्स
Published on

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. आता गल्लीबोळातील स्वच्छतेसाठी व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्सचा वापर करण्यात येणार आहे. यात एकूण सात संयंत्रे उपयुक्त ठरल्याने आणखी २१ वाहने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळात सखोल स्वच्छता मोहीम राबविताना पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिशय अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण अशा तंत्रज्ञानाचा वापर करून परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये मेकॅनिकल पॉवर स्विपिंग, भूमिगत कचरापेट्या, बंदिस्त कॉम्पॅक्टर वाहने आदी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईत स्वच्छतेची प्रक्रिया जलद करण्याचा घनकचरा विभागाचा मानस आहे.

त्याचाच भाग म्हणून पथदर्शी प्रकल्पात व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्सचा चांगला वापर होत असल्याने पालिकेच्या एम पूर्व, एन, जी उत्तर, डी, आर दक्षिण, के पश्चिम, एच पूर्व या विभागात सध्या सात संयंत्रे कार्यरत आहेत. या सातही विभागांमध्ये या संयंत्रांची कामगिरी समाधानकारक असल्यामुळे इतर विभागीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक यानुसार संयंत्रे घेण्यात येतील, अशी माहिती उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरे यांनी दिली.

१४२० लिटर कचरा साठवणूक क्षमता!

ओला आणि सुका अशा दोन्ही प्रकारचा कचरा उचलण्याची मशीनची क्षमता आहे. सुमारे १४२० लिटर इतकी कचरा साठवण्याची या मशीनची क्षमता आहे. तसेच कचरा ओढण्यासाठीच्या पाईपची लांबी ९.३ फूट इतकी आहे. तसेच २४० डिग्री इतके फिरू शकते. तसेच हे वाहन १८२५ किलो इतकी क्षमता हाताळण्याच्या क्षमतेचे आहे.

विविध प्रकारचा कचरा गोळा होणार

या संयंत्रांचा वापर हा विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यासाठी होतो. प्रामुख्याने प्लास्टिक, कागद, धूळ, वाळू, काचेचे तुकडे, बॉटल्स, कॅन, नारळ, तरंगता कचरा आदी गोळा करण्यासाठी या मशीन्स अतिशय उपयुक्त आहेत. ‘व्हॅक्यूम सक्शन’ पद्धतीने या मशीन्स कचरा ओढून घेण्याचे काम करतात. खुल्या वाहिन्या, अडगळीतील रस्ते आणि ठिकाणे याठिकाणीही मशीन उपयुक्त आहे. खेचून घेतलेला कचरा हा बंदिस्त ठिकाणी (कलेक्शन हॉपर) जमा करणे यामुळे शक्य होते.

logo
marathi.freepressjournal.in