एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा मतदार यादीत; ४ लाख ३३ हजार दुबार मतदार; BMC च्या मतदार यादीत घोळ

मुंबई महानगरपालिकेने निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली असून या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा मतदार यादीत; ४ लाख ३३ हजार दुबार मतदार; BMC च्या मतदार यादीत घोळ
एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा मतदार यादीत; ४ लाख ३३ हजार दुबार मतदार; BMC च्या मतदार यादीत घोळ
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत असताना मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीत घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेने निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली असून एकूण १ कोटी ३ लाख मतदार आहेत. मात्र, या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एकूण ४ लाख ३३ हजार दुबार मतदार असून त्यांची नावे एकापेक्षा अधिक वेळा आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हे मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करणार नाहीत, हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.

दरम्यान, सर्वाधिक दुबार मतदार प्रभाग क्रमांक १९९ मध्ये असून येथील त्यांची संख्या ८ हजार २०७ आहेत. तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक २२७ मध्ये असून येथील संख्या २ हजार ९८ एवढी आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जानेवारीच्या अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार मुंबईत १ कोटी तीन लाख मतदार आहेत. मात्र, यादीत एकाच व्यक्तीचे १०३ वेळा नाव मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. तब्बल चार लाख ३३ हजार नावे एकापेक्षा अनेकवेळा आहेत. अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता यावे यासाठी आयोगाच्यावतीने २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत घरोघरी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेत दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करावे, याची माहिती देण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक - सर्वाधिक दुबार मतदार

१९९ - ८,२०७

२०५ - ७,५८५

१९४ - ७,५८४

२०३ - ७,६२४

२०२ - ७,४७०

प्रभाग क्रमांक - सर्वात कमी दुबार मतदार

२२७ - २,०९८

१ - २,१४२

१८७ - २,४२६

१३४ - २,५८६

१८३ - २,६११

दुबार मतदान टाळण्यासाठी हमीपत्र भरून घेणार

ज्यांची नावे दुबार आहेत, अशा मतदारांशी २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिमेद्वारे संपर्क केला जाणार आहे. अशा मतदारांना ‘परिशिष्ट १’ अर्ज भरावा लागणार आहे. जे अर्ज भरणार नाहीत, त्यांच्या नावासमोर स्टार असेल. त्यामुळे अशा मतदारांचे नाव दुबार आहे, हे समजणार आहे. मतदानाच्या दिवशी अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करणार, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in