
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे २०२५ च्या आदेशानुसार, पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 'अ, ब, क' वर्ग महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने १० जून रोजी जारी केले आहेत. यानुसार मुंबई महानगरपालिकेने ११ जून पासून प्रभाग रचना प्रक्रिया सुरू केली आहे. तर संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होणार आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ अंतर्गत, प्रत्येक प्रभागातून चार, किमान तीन आणि कमाल पाच सदस्य निवडले जातील, अशी तरतूद २०२४ च्या अधिनियमानुसार आहे. प्रभाग रचना जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे होणार आहे. सरासरी लोकसंख्या ठरविण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले प्रभागातील सदस्य संख्या हे सूत्र वापरले जाणार आहे. दरम्यान, प्रभागाची लोकसंख्या सरासरीच्या १० टक्के कमी - जास्त असू शकते; अपवादात्मक कारणांसह यापेक्षा जास्त फरक असल्यास स्पष्टीकरण आवश्यक गरजेचे असणार आहे. तर, यावेळी प्रभाग रचना उत्तरेकडून सुरू होऊन दक्षिणेकडे पूर्ण होईल, भौगोलिक सलगता राखली जाईल. रस्ते, नद्या, रेल्वे मार्ग यांसारख्या नैसर्गिक सीमा विचारात घेतल्या जातील, अशी माहिती आहे.
दरम्यान, महानगरपालिका आयुक्त प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करतील आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करतील. यानंतर हरकती- सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर होईल. प्रभागांचे नकाशे गुगल अर्थवर तयार होऊन, प्रगणक गट, लोकसंख्या आणि सीमा स्पष्ट दर्शविल्या जातील. ही प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य राहावी, यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश आहेत. गोपनीयता भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
मतदान घटण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्याच्या कालावधीत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार ऑक्टोंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतू, या महिन्यात हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेला दिवाळी सण आला आहे. यामुळे अनेक जण रजेवर तसेच सणानिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. परिणामी, निवडणुकीतील मतदान घटण्याची दाट शक्यता उद्भवू शकते. त्यामुळे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होइल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.