

मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेबाबत आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिकेने बुधवारपासून प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ८ सप्टेंबर २०२२ च्या अधिनियमानुसार २२७ प्रभागांनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुंबई महापालिकेला प्रभाग रचनेबाबत तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे. म्हणजेच ११ जानेवारी ते ४ सप्टेंबर या कालबद्ध कार्यक्रमानुसार टप्पेनिहाय कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी प्रभाग रचना जाहीर होणार आहे. यानंतर आरक्षण सोडत, मतदार याद्या तयार करून निवडणुका केव्हाही जाहीर केल्या जातील. दरम्यान, या निवडणुका दिवाळीनंतर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून रखडल्या होत्या. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाने निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी केल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. तसेच राज्य शासनाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेला प्रभाग रचना करण्यासाठी तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रभाग रचना ४ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत होईल. त्यानंतर मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी महानगरपालिका २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीतील मतदार यादीचा आधार घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर केव्हाही निवडणुका जाहीर होतील.
शासनाचा कालबद्ध कार्यक्रम :
११ जून ते १६ जून २०२५ या कालावधीत आयुक्त भूषण गगराणी यांच्या अधिकाराखाली प्रगणक गटाची मांडणी करायची.
१७ आणि १८ जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे.
१९ ते २३ जून स्थळ पाहणी करणे.
२४ ते ३० जूनपर्यंत गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे.
१ ते ३ जुलै प्रभागातील जागेवर जाऊन तपासणे.
४ ते ७ जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे,
८ ते १० जुलैदरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे.
२२ ते ३१ जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे.
१ ते ११ ऑगस्ट प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे.
१२ ते १८ प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे.
२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.