Mumbai : नदीनाल्यात कचरा टाकल्यास फौजदारी कारवाई; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा इशारा, CCTV ची नजर

कचरामुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. कचरा जमा होणाऱ्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. तसेच नदीनाले सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे.
Mumbai : नदीनाल्यात कचरा टाकल्यास फौजदारी कारवाई; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा इशारा, CCTV ची नजर
Mumbai : नदीनाल्यात कचरा टाकल्यास फौजदारी कारवाई; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा इशारा, CCTV ची नजरX | @mybmc
Published on

मुंबई : कचरामुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. कचरा जमा होणाऱ्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. तसेच नदीनाले सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे.

दरम्यान, अश्विनी भिडे यांनी बुधवारी मानखुर्द, गोवंडी व परळ परिसरात सरप्राइज व्हिझिट देत सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेची झाडाझडती घेतली. कचरा साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करून तेथील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. कचरा संकलनाचे काम दररोज दोन सत्रांत राबवावे. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आणि फेऱ्या वाढवाव्यात. झोपडपट्टी व तत्‍सम भागातील कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम व नियमित करून कोणत्याही ठिकाणी कचरा साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्‍यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत समन्वय वाढवून त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच पदपथ नागरिकांना चालण्यायोग्य व अतिक्रमणमुक्त ठेवावेत, असेही निर्देश भिडे यांनी दिले.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्वच्छता चौक्या, परिरक्षण चौक्या आणि रस्ते दुरुस्ती चौक्यांना भेटी देत तेथील दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरी नोंद, स्वच्छतेसाठी उपलब्ध यंत्रसामुग्री आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेतली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत दैनंदिन कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच, स्वच्छता व्यवस्थेची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि वेळेचे काटेकोर नियोजन सुनिश्चित करण्यासाठी अधिक परिणामकारक पद्धतीने कामकाज करण्याचे निर्देश दिले.

यावेळी उपआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, उपायुक्‍त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मानखुर्दस्थित नीतू मांडके मार्गावरील मोटर लोडर चौकीपासून आजच्‍या दौऱ्याची सुरूवात झाली. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एम. पूर्व विभागातील घनकचरा व्‍यवस्‍थापन कार्यपद्धती, लोकसंख्‍या, उपलब्‍ध मनुष्‍यबळ, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आणि फेऱ्यांचा आढावा घेतला.

स्वच्छता सुधारणा सातत्याने चालणारी प्रक्रिया

प्रत्येक विभागाच्या स्थानिक गरजा आणि सूक्ष्म स्तरावरील अडचणी संबंधित विभागीय चमूलाच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रत्येक विभागातील सूक्ष्म स्तरावरील समस्यांचा सखोल अभ्यास करून संबंधित विभागीय चमूसोबत समन्वयाने परिणामकारक उपाययोजना आखाव्यात. स्वच्छता व्यवस्थापनातील सुधारणा ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, त्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू ठेवणे आवश्यक असल्‍याचे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नमूद केले.

पदपथ अतिक्रमण मुक्तच ठेवा!

पदपथ हे नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ पादचारी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पदपथ कायमस्वरूपी स्वच्छ, चालण्यायोग्य आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. पदपथांवर अनधिकृत वस्तू, बांधकाम साहित्य, फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारे अडथळे अथवा कचरा साचून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी नियमित पाहणी करून तत्काळ कार्यवाही करावी. पदपथांवरील अतिक्रमणे आणि अडथळे वेळोवेळी हटविण्यासोबतच त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी सातत्यपूर्ण देखरेख ठेवावी, असेही निर्देश भिडे यांनी दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in