
पूनम पोळ/मुंबई
मुंबई महापालिकेने रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रस्ते स्वच्छ, मोकळे आणि फेरीवालामुक्त करण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार सुरुवातीला मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे २० रेल्वे स्टेशनचा परिसर फेरीवालामुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र, पालिका कसोशीने प्रयत्न करत असली तरी त्या प्रयत्नांना फेरीवाल्यांकडून हरताळ फासल्याचा प्रकार मालाडमधून समोर आला आहे. पालिका गाडीची पाठ फिरली की फेरीवाले रस्त्यावर पथारी मांडून सामान विक्रीला बसतात. ये साब लोग रोज आते है, दोपहर तक बैठने नही देते, जब अंधेरा होने लगता है, तब ये लोग बीएमसी की गाडी लगाकर जाते है! अशी वाक्ये या फेरीवाल्यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले. पालिकेला जर कायद्याद्वारे फेरीवाल्यांना हटवता येत नसेल, तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या, असे म्हणत महापालिकेचे कान उपटले. सध्या सुरू असलेली कारवाई पुढेही कायम अशाच प्रकारे ठेवण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतराच्या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात महापालिका प्रशासन आणि पोलिसांचे प्रयत्न कमी पडताना दिसत आहेत. मालाड पश्चिम येथील फेरीवाल्यांमुळे होणारी गर्दी हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. एका बाजूला मिठाईवाल्याच्या दुकानाबाहेर होणारी खवय्यांची गर्दी, तर अवघ्या काही पावलांवर असलेली अन्य विक्रेत्यांची गर्दी कमी करणे पालिका प्रशासनाला शक्य होत नाही. मालाड पश्चिम येथे प्रसिद्ध असलेल्या नटराज मार्केटच्या बाहेर असलेल्या गर्दीतून मोकळा श्वास घेणेही कित्येकांना कठीण होते. परिणामी येथून प्रवास करणाऱ्या बेस्ट चालकापासून रिक्षाचालकाला, तर दुचाकीपासून सायकल चालवणाऱ्याला या गर्दीला सामोरे जाणे मोठे अग्निदिव्य ठरत आहे. परंतु, पालिका प्रशासन करत असलेली कारवाई ही क्षणिक असणार आहे, याचा सुगावा लागल्यामुळे येथील फेरीवाले मस्तवाल झाले आहेत.
पालिकेने काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरचे अनधिकृत बांधकाम पाडले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढली आहे. म्हणून आता बस वळायला जागा झाली आहे. पण बस वळवताना रिक्षावाले, दुचाकीस्वार, चारचाकीवाले आणि विशेष म्हणजे आजूबाजूला संसार थाटून बसलेले फेरीवाले यांचा सर्वात जास्त त्रास होतो. फेरीवाल्यांना सामान जरा मागे घ्यायला सांगितले तर ते हुज्जत घालायला लागतात. बसची सुरुवात ज्या ठिकाणावरून होते तिथे महिलांचे कपडे विकणारे लोक असतात. त्यामुळे इथे महिलांची गर्दी अधिक असते. महिलांना बाजूला व्हा असे म्हटले किंवा वारंवार हॉर्न वाजवले तर त्या पुटपुटायला लागतात. मग अशा ठिकाणी बस चालवणे मोठे दिव्य असते, असे बसचालक सांगतात.
आम्ही स्टेशनपासून थेट मार्वेपर्यंत प्रवासी घेतो. पण स्टेशनपासून मुख्य रस्त्यावर यायला खूप वेळ लागतो. सणासुदीच्या वेळेत एवढ्याच जागेत ट्रॅफिकमध्ये अडकलो की ५ ते १० मिनिटे सहज जातात. आजूबाजूचे फेरीवाले सरकायला तयार नसतात. आम्ही एक बोललो की ते दोन बोलतात. काही फेरीवाल्यांची भाषा कळत नाही. त्यामुळे फेरीवाले नसले की गाडी सहज काढता येणे शक्य असल्याचे रिक्षावाले सांगतात.
पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कारवाईला मर्यादा
आम्ही सतत कारवाई करत असतो. पण आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. आम्ही गाडी घेऊन जातो. पण ती फिरवून कारवाई करता येत नाही. ज्यादिवशी मनुष्यबळ असते तेव्हाच सक्षमपणे कारवाई करता येते. त्यातच मालवणी परिसरातून सातत्याने तक्रारी येत असतात. त्यांचा निपटारा करण्यातच आमचा वेळ जातो. त्याकडे दुर्लक्ष झाले तर माहितीच्या अधिकारात विचारणा केली जाते, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.