
मुंबई : पाळीव व भटक्या कुत्र्यांना आता पालिकेने निश्चित केलेल्या जागेवरच खाद्यपदार्थ देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. पाळीव व भटक्या कुत्र्यांना कुठल्या वेळेत खाद्यपदार्थ द्यावेत याबाबत नियमावली तयार करण्यात येत असून याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या तीन लाखांच्या घरात आहे. मनुष्याप्रमाणे जनावरांना ही जगण्याचा अधिकार आहे. मात्र भटक्या कुत्र्यांमुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या व दुचाकीस्वारांना, विशेष करून रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भटक्या कुत्र्यांचे वेळोवेळी निबिजीकरण करण्यात येते. पालिकेने निश्चित करून दिलेल्या जागेवर आणि निश्चित केलेल्या वेळेतच भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ द्यावे, असे आवाहन प्राणी प्रेमींना करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
खाद्यपदार्थासाठी निश्चित जागा
रस्त्यांवरील कुत्र्यांना कुठेही खाद्यपदार्थ टाकण्यात येऊ नये यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ घालण्यासाठी एखादी जागा निश्चित करण्यात येत आहे.