वर्सोवा बोट दुर्घटनेतील दुसऱ्याचा मृतदेह ६० तासानंतर आढळला

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले
वर्सोवा बोट दुर्घटनेतील दुसऱ्याचा मृतदेह ६० तासानंतर आढळला

मुंबई : वेसावे गावातील देवाचीपाडा येथील समुद्रात मासेमारी करून परतत असताना शनिवार ६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता होडी बुडाली. या होडीत तिघे जण होते, त्यापैकी एक जण पोहत समुद्रकिनारी आल्याने बचावला. तर दुसऱ्या बेपत्ता मुलाचा रविवारी दुपारी शोध लागला. त्याला कूपर रुग्णालयात पाठवले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिसरा बेपत्ता मुलगा ६० तासानंतर वर्सोवा चौपाटीवर आढळला. त्याला जवळील शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वेसावे गावातील देवाचीवाडीमधील विजय बमानिया (३५), उशानी भंडारी (२२) आणि विनोद गोयल (४५) हे मासेमारी करून शनिवारी रात्री परतत असताना त्यांची होडी वर्सोवा किनाऱ्यापासून ३ किलोमीटर अंतरावर बुडाली. यातील विजय बमानिया याने पोहत येऊन मढ किनारा गाठला आणि झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी तत्काळ याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दल, जीवरक्षक, स्थानिक मच्छिमारांनी बुडालेल्या उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, दुपारी यातील विनोद गोयल यांचा मृतदेह जीवरक्षकांच्या हाती लागला. तर तब्बल ६० तासानंतर उशानी भंडारी (२२) यांचा मृतदेह वर्सोवा चौपाटीवर आढळला.

logo
marathi.freepressjournal.in