मालवणीतील बोगस मुन्नाभाईला केली अटक

शहरातील तोतया डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती
मालवणीतील बोगस मुन्नाभाईला केली अटक

कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना क्लिनिकमध्ये येणार्‍या रुग्णांवर उपचार करुन त्यांच्या जिवाशी खेळ करणार्‍या मालवणीतील बोगस मुन्नाभाईला कांदिवली पोलिसांनी अटक केली. मसिहूदीन खान असे या तोतया डॉक्टरचे नाव असून तो पूर्वी एका डॉक्टरकडे कंपाऊंडरचे काम करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील तोतया डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना मालवणीतील गायकवाड नगर परिसरात एक क्लिनिक असून या क्लिनिकमध्ये मसिहूदिन खान हा डॉक्टर असल्याची बतावणी करुन रुग्णांवर उपचार करतो. त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना तो रुग्णांच्या जिवाशी खेळ करत असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर कांदिवली पोलिसाच्या एका विशेष पथकाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने खानच्या क्लिनिकमध्ये छापा टाकला होता. त्याच्याकडे काही वैद्यकीय प्रमाणपत्रे सापडली. ती बोगस होती.

तो हैद्राबादचा रहिवाशी असून तेथून त्याने बीएचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत आला होता. काही दिवस त्याने भावाच्या मेडीकल दुकानात सेल्समन म्हणून काम केले. ही नोकरी सोडल्यानंतर तो चारकोप येथील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करीत होता. पाच वर्षे काम करताना त्याने रुग्णांना कुठल्या गोळ्या द्यायच्या, ही माहिती मिळवली होती. त्यानंतर त्याने स्वतचा क्लिनिक सुरु केला होता. त्याच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. तरीही तो गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करीत होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in