चेक बाऊन्स प्रकरणात निर्माता अब्दुल सिद्दीकी दोषी

बॉलिवूड निर्माते अब्दुल समी सिद्दीकीला चेक बाऊन्स प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हा निर्णय देतानाच न्यायालयाने २०१९ मधील वांद्रे न्यायदंडाधिऱ्यांच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले.
चेक बाऊन्स प्रकरणात निर्माता अब्दुल सिद्दीकी दोषी
चेक बाऊन्स प्रकरणात निर्माता अब्दुल सिद्दीकी दोषी
Published on

मुंबई : बॉलिवूड निर्माते अब्दुल समी सिद्दीकीला चेक बाऊन्स प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हा निर्णय देतानाच न्यायालयाने २०१९ मधील वांद्रे न्यायदंडाधिऱ्यांच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. याचवेळी सनराइज पिक्चर प्रायव्हेट लिमिटेडला तांत्रिक कारणावरून न्यायालयाने निर्दोषमुक्त केले. न्यायालयाच्या निर्णयाने अब्दुल सिद्दीकीला मोठा झटका बसला आहे. नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हॉर्न ओके प्लीज’ आणि अजय देवगण अभिनीत ‘हल्लाबोल’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमुळे अब्दुल सिद्दिकी प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या निर्णयाला सिद्दीकीने सत्र न्यायालयात दाद मागितली होती. दंडाधिकाऱ्यांचा आदेश विविध अर्थाने चुकीचा असल्याचा दावा सिद्दीकीने केला होता. तथापि, आरोपांना पुष्टी देणारे सबळ पुरावे असल्याचे निरिक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांचा आदेश योग्यच असल्याची टिप्पणी केली. हा खटला सिद्दीकी, त्याची कंपनी सनराइज पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि तक्रारदार अशफाक एच मन्सुरी यांच्यातील आर्थिक वादाशी संबंधित आहे.

३० दिवसांच्या आत दुप्पट रक्कम परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तक्रारदार मन्सूरीने सिद्दीकीकडे साडेपाच लाख रुपये रोख गुंतवले होते. नंतर ती रक्कम परत करण्यासाठी सिद्दीकीने धनादेश दिला होता. तो धनादेश पुरेशा पैशांअभावी बँकेने नाकारला होता.

logo
marathi.freepressjournal.in