दादर रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोटाची धमकी

आरोपीविरोधात गुन्हा दाखल
दादर रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई : दादर रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखा आणि एटीएसचे अधिकारी करत आहेत.

शनिवारी दुपारी बारा वाजता सायबर पोलीस ठाणे, सायबर डेस्क हेल्पलाईनमध्ये समोरील व्यक्तीने फोन करून १५ ऑगस्टला दादर रेल्वे स्थानक साखळी बॉम्बस्फोट होणार आहे, असे सांगितले. यावेळी तुम्ही कोठून बोलत आहात, अशी विचारणा पोलिसांनी केल्यानंतर त्याने फोन बंद केला. त्यानंतर त्यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली होती.

वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस शिपाई अभिजीत राऊत यांनी बीकेसी पोलिसांत या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. दादर रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगून भीतीदायक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान या धमकीनंतर दादरसह मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. संशयित व्यक्तींची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in