बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता धर्मेंद्र आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन नागपूर पोलिसांना आला होता. नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाला आलेला हा फोन एका अज्ञात व्यक्तीने केला असून पालघरच्या शिवाजीनगर भागातून आल्याचे तपासात समोर आले. हेल्पलाइन क्रमांक ११२वर नागपूर शहरातील लक्कडगंजमध्ये असलेल्या नियंत्रण कक्षाला फोन आला होता.
काही मोठ्या व्यक्तींचे बंगले बॉम्बस्फोटने उडवून देण्यासाठी २५ जण मुंबईत आल्याची माहिती या फोन संभाषणातून समोर आले. यानंतर नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून याबाबत तपास सुरु केला आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने म्हणाले आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भारतात आणि परदेशातही 'झेड प्लस' सुरक्षा पुरवण्यात यावी. तसेच, फक्त मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी कमी खर्चिक असली, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. मात्र, हा खर्च अंबानी कुटुंबियांकडून घेण्यात यावा." असे निर्देश दिले आहेत.