

मुंबई : कामावर जाणाऱ्या प्रवाशाला ‘पीक अवर’ला लोकलमध्ये शिरणे कठीण असते. अशा वेळी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई द्यावी, असा आदेश रेल्वे प्राधिकरणाला दिला.
पीक अवरला लोकलमध्ये दरवाज्याजवळ उभे असताना झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रेल्वेकडून मृत प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. या गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.
भाईंदरहून मरीन लाइन्सला प्रवास करताना २८ ऑक्टोबर २००५ रोजी प्रवासी लोकल ट्रेनमधून पडला. या अपघातात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकाला भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्राधिकरणाने दिला. मात्र त्या विरोधात रेल्वेने याचिका दाखल केली होती.