
मुंबई : परिपूर्ण नुकसानभरपाई देणे शक्य नसले तरी न्याय्य भरपाई देणे सुसंगत असले पाहिजे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मिळालेली ६२ लाख रुपयांची नुकसानभरपाई कायम ठेवली आहे. या कर्मचाऱ्याचा मृत्यू एका हिट अॅन्ड रन अपघातात झाल्यानंतर काही वर्षांनी झाला होता.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने ९ मे रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२० मध्ये मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशात कुठलाही कायदेशीर दोष आढळून आलेला नाही. त्यामुळे तो आदेश रद्द करण्यात येऊ शकत नाही.
मोटार वाहन कायदा हा कल्याणकारी कायदा आहे आणि संविधानातील अनुच्छेद २१ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या सन्मानपूर्वक जीवन जगण्याच्या मूलभूत हक्कावर न्यायालय डोळेझाक करू शकत नाही, असेही निरिक्षण नोंदविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत उच्च न्यायालयाने म्हटले, पैसा हा प्राण गमावल्याची भरपाई होऊ शकत नाही. मात्र झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई नक्कीच करू शकतो. परिपूर्ण नुकसानभरपाई शक्य नाही. मात्र न्याय्य नुकसानभरपाई हीच नीती असायला हवी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊसमध्ये अॅनिमेटर म्हणून कार्यरत असलेल्या चारू खंडाळ यांच्या कुटुंबाला दिलेली ६२ लाख रुपयांची भरपाई कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाला "एक हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना" असे संबोधत न्यायालयाने, एका तरुण, आशावादी व्यावसायिक महिलेने अपघातानंतर तिने कठीण आयुष्य भोगले, असेही म्हटले.
चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने न्यायाधिकरणाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. चारूचा मृत्यू आणि अपघातातील जखमांमध्ये थेट संबंध नाही. तेव्हा अपघातानंतर तिचा मृत्यू चार वर्षांनंतर झाला. परिणामी भरपाई लागू होत नाही, असा युक्तिवाद कंपनीने केला होता. उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद नाकारताना म्हटले की, चारुचा मृत्यू हा सेप्टीसीमियामुळे झाला. तिला ट्रॉमॅटिक क्वाड्रिप्लेजियामुळे (पूर्ण पक्षाघात) झाला होता. खंडाळ कुटुंबाने तिच्या उपचारांसाठी १८ लाख रुपये वैद्यकीय खर्च केला होता, असेही न्यायालयाने नमूद केले. खंडपीठाने स्पष्ट केले की, अपघातानंतरच्या पाच वर्षांमध्ये ती पूर्णतः अक्षम आहे. यामुळे तिला सतत परिचारिका आणि फिजिओथेरपीची गरज होती, हे न्यायाधिकरणाचे निरीक्षण योग्य होते.
घटना काय?
चारू खंडाळ याने शाहरुख खानच्या "रा.वन" चित्रपटासाठी व्हीएफएक्सवर काम केले होते. तिचा मृत्यू २०१७ मध्ये झाला. २०१२ मध्ये ओशिवरा येथे एका वेगात असलेल्या गाडीने तिने प्रवास करत असलेल्या रिक्षाला धडक दिल्यानंतर तिच्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ती गळ्याखालून पूर्णपणे पक्षाघातग्रस्त झाली होती. अपघाताच्या वेळी ती २८ वर्षांची होती आणि रा.वन चित्रपटासाठी तिच्या चमूने मिळवलेल्या पुरस्काराच्या पार्टीमधून परतत होती.