

मुंबई : आक्षेपार्ह, शिवीगाळयुक्त किंवा असभ्य भाषा वापरली म्हणजे ती कायद्याच्या नजरेत 'अश्लीलता' ठरत नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एअर इंडिया केबिन क्रू मेंबरला मोठा दिलासा दिला. याचवेळी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अश्लील साहित्य प्रसारित केल्याच्या आरोपातून केबिन क्रू मेंबरला मुक्त केले.
आरोपी मयंक शर्मा हा एअर इंडियाचा केबिन क्रू मेंबर असून ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनचा पदाधिकारी म्हणून सक्रिय होता. असोसिएशनमधील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. शर्माने फेसबुक आणि ऑर्कुटवर असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांना आणि काही राजकीय व्यक्तींना लक्ष्य करून अश्लील, बदनामीकारक आणि अपमानास्पद टिप्पण्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. यावरून ११ मे २०१२ रोजी वांद्रे-कुर्ला संकुल सायबर सेल येथे एफआयआर दाखल करण्यात आला होता. शर्मावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७-अ अन्वये अश्लील साहित्य प्रकाशित आणि प्रसारित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शर्माला अटकही झाली होती. त्यामुळे शर्माने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
अट अश्लील ठरवण्यात अपूर्ण
आक्षेपार्ह किंवा शिवीगाळयुक्त भाषा वापरणे म्हणजे आपोआप अश्लीलता ठरत नाही. शर्माने केलेली पोस्ट आक्षेपार्ह, असभ्य असू शकते. अश्लीलता सिद्ध करण्यासाठी कायदेशीर अटी त्या पूर्ण करत नाहीत. एखादी गोष्ट अश्लील ठरवण्यासाठी ती लैंगिक भावना किंवा कामुक असावी आणि पाहणाऱ्याच्या मनावर वाईट परिणाम करणारी असावी, असे निरीक्षण नोंदवले.