मुलाला दिलेल्या फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द; न्यायालयाने ताबा पुन्हा दिला वडिलांकडे

मालमत्ता बक्षीसपत्र म्हणून स्वीकारणाऱ्या मुलांवर वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने मुलाच्या नावे केलेले फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द केले आहे, तसेच संबंधित फ्लॅटचा ताबा पुन्हा त्या वृद्ध पित्याकडे देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुलाला दिलेल्या फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द; न्यायालयाने ताबा पुन्हा दिला वडिलांकडे
Published on: 

मुंबई : मालमत्ता बक्षीसपत्र म्हणून स्वीकारणाऱ्या मुलांवर वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने मुलाच्या नावे केलेले फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द केले आहे, तसेच संबंधित फ्लॅटचा ताबा पुन्हा त्या वृद्ध पित्याकडे देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती आरती साठे यांनी २६ नोव्हेंबरला हा निकाल दिला. मुलाने वडिलांचा छळ केल्याचे आणि त्यांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचे पुरावे असतानाही बक्षीसपत्र रद्द करण्यास नकार देऊन संबंधित प्राधिकरणांनी गंभीर आणि चुकीचा निर्णय घेतला आहे, असे न्यायालयाने ताशेरे ओढले. आर्थिक साधनसंपत्ती किंवा राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने या वृद्धाला २०२२ पासून वृद्धाश्रमात राहावे लागत असल्याची नोंद न्यायालयाने घेतली. स्वतःचा सांभाळ करण्यास असमर्थ असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा सांभाळ ज्या मुलाच्या नावे फ्लॅटचे बक्षीसपत्र केले आहे, त्याने न करणे ही अत्यंत विसंगत परिस्थिती ठरेल, असे न्यायालयाने नमूद केले. निवासाच्या हक्कासोबतच ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्याचा अधिकारही आपोआप येतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. उतारवयात कुटुंबासोबत शांततेत आणि आनंदात राहण्याऐवजी पिता-पुत्र दीर्घकाळ न्यायालयीन लढाईत अडकले, ही दुर्दैवी बाब असल्याचे मतही न्यायमूर्ती साठे यांनी व्यक्त केले.

मुलाने केला होता दावा

बक्षीसपत्रात सांभाळ करण्याची स्पष्ट अट नमूद केलेली नाही, असे कारण देत न्यायाधिकरणाने बक्षीसपत्र रद्द करण्यास नकार दिला होता. अपिलीय न्यायाधिकरणानेही दिलासा देण्यास नकार दिल्याने या पित्याने मार्च २०२४ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधिकरणाचा आदेश योग्य असून हे प्रकरण पुन्हा विचारार्थ पाठवावे, असा युक्तिवाद मुलाच्या वकिलांनी केला. हा फ्लॅट मुलाच्या पैशातून खरेदी केला असून पित्याला आयुष्यभर राहण्याचा हक्क कधीही नाकारला नसल्याचा दावा त्यांनी केला. पित्याची बाजू मांडणारे वकील दुष्यंत पुरेकर आणि रजत देढिया यांनी बक्षीसपत्र करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचा आणि ते रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचा युक्तिवाद केला.

फ्लॅटचा ताबा मिळताच वडिलांना केले बेघर

संबंधित वृद्धाने २०१८ मध्ये मुलाच्या नावे फ्लॅटचे बक्षीसपत्र केले होते. या बक्षीसपत्रात पित्याला आयुष्यभर त्या फ्लॅटमध्ये राहण्याचा हक्क देण्यात आला होता. मात्र, मुलासोबत झालेल्या वादानंतर त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली. याविरोधात त्यांनी माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. न्यायाधिकरणाने मार्च २०२३ मध्ये मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचे आणि बक्षीस दिलेल्या गोदामाचे भाडे पित्याला देण्याचे आदेश दिले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)