मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका

न्यायालयाने आईच्या हट्टी स्वभावावर तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट मत मांडले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रएआयने बनविलेली प्रतिमा
Published on

मुंबई : मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आयुष्यात आई आणि वडील दोघांचीही उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. दोन्ही पालकाचे स्थान तितकेच महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुलाच्या कोठडीच्या प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेला झटका दिला. ६ वर्षांच्या मुलाच्या ताब्याशी संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने आईच्या हट्टी स्वभावावर तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट मत मांडले.

मुलाच्या पालकांचे अर्थात या प्रकरणातील पती-पत्नीचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. २०२० मध्ये त्यांना मुलगा झाला. मात्र, कौटुंबिक वादानंतर मे २०२१ पासून दोघेही वेगळे राहत आहेत. मुलाचा ताबा सध्या आईकडे आहे. वडिलांनी मुलाला भेटण्याचा अधिकार मिळावा, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने वडिलांच्या बाजूने निर्णय दिला होता.

आईची अतिमालकी हक्काची भावना घातक

आई आपल्या पतीबद्दलच्या रागामुळे मुलाला वडिलांपासून दूर ठेवत आहे. आईची ही अतिमालकी हक्काची भावना मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी आणि विकासासाठी हानिकारक ठरू शकते. मुलाच्या मनात वडिलांबद्दल किंवा वडिलांच्या कुटुंबाबद्दल कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा नकारात्मकता निर्माण करण्याचा अधिकार आईला नाही, असेही मत न्यायालयाने नोंदवले.

logo
marathi.freepressjournal.in