

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्याच्या काही तास आधीच, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) धक्का दिला आहे. उमेदवारांच्या बिनविरोध निवडीविरुद्ध मनसेची याचिका स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ६७ बिनविरोध उमेदवारांविरुद्ध मनसेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार देत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना दिलासा दिला.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावतीने ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी कोर्टात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सोमवारी केवळ याचिकाच फेटाळून लावली नाही तर चुकीची माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल खंडपीठाने याचिकाकर्त्यांना चांगलेच धारेवर धरले. आज सकाळी ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी सांगितले की ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित आहे. यामुळे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
खंडपीठाने म्हटले, ही याचिका इतर याचिकांसारखीच असल्याचे चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावणार आहोत आणि याचिका फेटाळणार आहोत. आता सांगा, तुम्ही चुकीचे विधान का केले? एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई किंवा भीती काय होती?, असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बिनविरोध उमेदवारांच्या प्रकरणांची उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी किंवा संपूर्ण प्रक्रिया न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी, अशी मागणी केली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत या उमेदवारांना विजयी घोषित करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती.
फेटाळण्यात आलेली याचिका माझी नव्हती तर, दुसऱ्याची होती. आजची याचिका ‘नोटा’ या विषयांमध्ये अजय जेया यांची होती, ती न्यायालयाने फेटाळली. तसेच कुठलाही दंड न्यायालयाने ठोठावला नाही. मी दाखल केलेल्या ‘बिनविरोध निवड’ संदर्भातील याचिकेवर कुठल्याही प्रकारची सुनावणी न्यायालयाकडून झालेली नाही. कृपया आपण चुकीचे मेसेज पसरवू नका, ही माझी विनंती आहे, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.