मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या कोर्टरूम ड्रामा सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.
याचिकेत न्यायाधीश आणि वकिलांची चेष्टा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आमच्याबद्दल काळजी करू नका, असे न्यायालयाने सांगितले.
‘असोसिएशन फॉर एडिंग जस्टीस’ संस्थेने वकील चंद्रकांत गायकवाड यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी तसेच ‘भाई वकील है’ हे गाणे हटवावे, अशी मागणी याचिकेत केली होती.
याचिकादारांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात वकिलांबरोबरच न्यायाधीशांचीही चेष्टा करण्यात आली आहे. चित्रपटातील एका दृश्यात न्यायाधीशांना 'मामू' असे संबोधले आहे.
आम्ही पहिल्या दिवसापासूनच अशा चेष्टांना सामोरे जात आहोत. आमच्याबद्दल चिंता करू नका, असे नमूद करत मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.