

मुंबई : जन्मदात्या आईचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य असल्याचे अधोरेखित करत उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कृतघ्न मुलाची चांगलीच कानउघाडणी केली. आईची काळजी न घेण्याचे मुलाचे वर्तन म्हणजे पोटच्या मुलाने आईला वाऱ्यावर सोडून देण्यासारखे आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
७६ वर्षीय वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती ठीक होऊन रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्यानंतरही मुलाने आपल्या आईला रुग्णालयातच सोडून दिले. मुलाच्या या वर्तनाकडे लक्ष वेधत वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रुग्णालयाच्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. यावेळी खंडपीठाने मुलाच्या वर्तनावर संताप व्यक्त केला आणि त्याला जन्मदात्या आईबद्दल असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
“या प्रकरणातील मुलाचे वर्तन पाहून न्यायालयाच्या विवेकाला धक्का बसला आहे. मुलगा आपल्या आईबद्दल ज्या पद्धतीने वागला आहे, ते त्याचे वर्तन अत्यंत अक्षम्य, दुर्दैवी आणि दुःखद आहे,” अशी टिप्पणी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने केली. त्यानंतर वृद्ध आईला महापालिकेच्या भाभा रुग्णालयात हलविण्याचा आणि तेथील खर्च भरण्याचा आदेश खंडपीठाने वृद्ध महिलेच्या मुलाला दिला. “जर मुलाने आदेशाचे पालन केले नाही, तर सरकारने महिलेचा ताबा घ्यावा आणि तिला सरकारी रुग्णालयात हलवावे,” असे खंडपीठाने निर्णय देताना स्पष्ट केले.