

मुंबई : जागेच्या मालकाविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित आहे या कारणावरून रुग्णांना वैद्यकीय सुविधेपासून वंचित ठेवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले.
याचवेळी नाशिकमधील प्रस्तावित ‘पेट-सीटी स्कॅन’ केंद्राला आठवडाभरात सर्व आवश्यक परवानग्या देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.
जागामालकावरील खटल्यामुळे वैद्यकीय केंद्राची परवानगी रोखणे म्हणजे रुग्णांच्या आरोग्याच्या हक्कावर थेट गदा आणण्यासारखे आहे. हा हक्क भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ चा अविभाज्य भाग असल्याचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. ‘सूर्योदय न्यूक्लियर मेडिसिन सर्व्हिसेस एलएलपी’ या संस्थेने नाशिकमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी पेट-सीटी स्कॅन केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रशासनाने गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा, १९९४ अंतर्गत संबंधित अर्ज फेटाळून लावला होता.