जहाजांवर अडकलेल्या ५० खलाशांची सुटका करा; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश

मुंबई किनारपट्टीजवळ जप्त करण्यात आलेल्या तीन जहाजांवर अडकलेल्या ५० खलाशांची तत्काळ सुटका करा, असे सक्त आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी संबंधित जहाजांच्या मालकांना दिले.
मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई किनारपट्टीजवळ जप्त करण्यात आलेल्या तीन जहाजांवर अडकलेल्या ५० खलाशांची तत्काळ सुटका करा, असे सक्त आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी संबंधित जहाजांच्या मालकांना दिले. जहाज मालकांनी खलाशांना पाळीव प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली आहे, अशा कठोर शब्दांत ताशेरे ओढतानाच न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने खलाशांच्या सुटकेचा आदेश देत त्यांना मोठा दिलासा दिला.

समुद्रात बेकायदेशीरपणे इंधन आणि बिटुमेनची वाहतूक केल्याप्रकरणी एमटी अस्फॉल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया ही जहाजे मुंबईच्या किनारपट्टीपासून ११ नॉटिकल मैल अंतरावर जप्त करण्यात आली. या तीन जहाजांवर ५० खलाशी अडकले होते. जहाजावर अन्न व पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे ७ खलाशांनी उच्च न्यायालयात ‘हॅबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने जहाज मालकांना मोठा झटका दिला.

खंडपीठाने जहाज मालकांच्या बेजबाबदार वृत्तीवर तीव्र संताप व्यक्त केला. जीवन एकदाच मिळते, आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, असे खडे बोल खंडपीठाने जहाज मालकांना सुनावले. खलाशांना दिवसाला केवळ ३०० मिली पाणी दिले जात असल्याचे समोर येताच न्यायालय चांगलेच संतापले. पाळीव प्राण्यांनाही यापेक्षा जास्त पाणी मिळते. आम्ही मानवी जीवाशी असा खेळ खपवून घेणार नाही, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in