

मुंबई : अनुकंपा नियुक्ती हा नोकरी मिळवण्याचा कोणताही हक्काचा अधिकार नाही. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी मृत्यूच्या वेळचेच धोरण लागू होतील. नंतरचे नियम लागू करता येणार नाहीत, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्या. सुमन श्याम आणि न्या. गौतम अंखड खंडपीठाने हा निकाल दिला.
दौंड येथील रहिवासी ऋषिकेश चव्हाण यांनी याचिका दाखल केली होती. त्यांचे वडील बालभारती (पुणे) येथे ‘सीनिअर असिस्टंट स्टोअर कीपर’ म्हणून कार्यरत होते आणि २८ ऑगस्ट २०१९ रोजी सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तत्कालीन २०१७च्या धोरणानुसार अनुकंपा नियुक्ती फक्त गट ‘क’ आणि गट ‘ड’मधील कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच लागू होती. त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाचा अर्ज फेटाळण्यात आला होता. २७ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य सरकारने नवीन जीआर काढून १ जानेवारी २०२० पासून गट ‘अ’, गट ‘ब’मधील कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही हा लाभ लागू केला होता.