पैशांच्या वादावरून पुनर्विकास प्रकल्प रोखता येणार नाही; उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

केवळ आर्थिक वाद असल्याच्या कारणावरून मध्यस्थी आणि सलोखा अधिनियम, १९९६ मधील कलम ९ अंतर्गत सुरू असलेला व्यवसाय किंवा पुनर्विकास प्रकल्प थांबवता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पैशांच्या वादावरून पुनर्विकास प्रकल्प रोखता येणार नाही; उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
पैशांच्या वादावरून पुनर्विकास प्रकल्प रोखता येणार नाही; उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : केवळ आर्थिक वाद असल्याच्या कारणावरून मध्यस्थी आणि सलोखा अधिनियम, १९९६ मधील कलम ९ अंतर्गत सुरू असलेला व्यवसाय किंवा पुनर्विकास प्रकल्प थांबवता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भविष्यातील लवादाच्या निर्णयानुसार रक्कम वसूल होऊ नये म्हणून दुसरा पक्ष मालमत्ता विकण्याची किंवा हस्तांतरित करण्याची शक्यता असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी एम. एस. घोरी एंटरप्रायजेसला त्यांच्या मालमत्तांबाबत व्यवहार करण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश रद्द करताना हा निर्णय दिला. यामध्ये बोरीवलीतील पुनर्विकासाच्या मालमत्तेचाही समावेश होता. मात्र, माजी भागीदार स्नेहलता अनुराग सिंह यांना कथित थकीत दीड कोटी रुपयांच्या वसुलीसाठी लवादाकडे जाण्याची मुभा न्यायालयाने दिली.

भागीदारी संस्थेतील ८० टक्के हिस्सा मिळवला होता

‘कलम ९ चा उद्देश मध्यस्थी प्रक्रियेतील विषयवस्तूचे संरक्षण करणे आणि भविष्यात दिला जाणारा लवादाचा निर्णय निष्फळ ठरू नये, याची खात्री करणे हा आहे. केवळ पक्षांमध्ये आर्थिक वाद आहे म्हणून सुरू असलेला व्यवसाय किंवा पुनर्विकास प्रकल्प थांबवण्यासाठी या कलमाचा वापर करता येणार नाही,’ असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. १६ जानेवारी २०१९ रोजी सिंह यांनी भागीदारी संस्थेतील ८० टक्के हिस्सा मिळवला. रखडलेला फतेहपूर हाऊस पुनर्विकास प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी भागीदारांनी निधीची मागणी केल्यानंतर त्यांनी हा हिस्सा घेतला होता.

मालमत्तेवरील अधिकाराला तात्पुरती मनाई

२३ जुलै २०२२ रोजी त्यांनी दोन दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या केल्या. एकात भागीदारीतून निवृत्त झाल्याची नोंद होती, तर दुसऱ्या दस्तऐवजात त्यांनी १.६८ कोटी गुंतवले असून त्याच्या तडजोडीपोटी दोन कोटी मिळणार असल्याचे नमूद होते. मात्र, उर्वरित रक्कम मिळाली नसल्याचा त्यांचा दावा होता. लवादाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सिंह यांनी संस्थेच्या मालमत्तांना संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात धाव घेतली.

भाडेकरूंच्या पुनर्वसन प्रक्रियेवर परिणाम

संस्था भविष्यातील लवादाच्या निर्णयाला निष्फळ ठरवण्यासाठी मालमत्ता विकत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने म्हटले. मालमत्तांवरील सर्व व्यवहारांना मनाई केल्यास परवानगीप्राप्त मालमत्ता विक्री, घरखरेदीदार आणि १६ भाडेकरूंच्या पुनर्वसन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असेही न्यायालयाने नमूद केले.

नव्या भागीदाराची गुंतवणूक

हा मनाई आदेश उठवण्याची मागणी करत घोरी एंटरप्रायजेसने न्यायालयात सांगितले की, दस्तऐवजावर स्वाक्षरी झाल्यानंतर सिंह भागीदारीतून निवृत्त झाल्या होत्या आणि त्यांना बँक हस्तांतरणाद्वारे ५० लाख रुपये देण्यात आले होते. उर्वरित दीड कोटी रुपयांसाठी तीन मुदतपूर्व तारखांचे धनादेश दिले होते. नव्या भागीदार राठी लाइफस्पेसेस रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने प्रकल्पात ३.९६ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचेही संस्थेने न्यायालयाला सांगितले.

न्यायालयाने सिंह यांची भागीदारीतून निवृत्ती प्रभावी झाल्याचे मान्य केले. मात्र, पूर्वीच्या करारानुसार त्यांचे अधिकार सोडण्याची प्रक्रिया धनादेश वटण्याच्या अटीवर होती. हे धनादेश वटले की नाही, याबाबत न्यायालयासमोर असलेल्या नोंदींमधून स्पष्टता नसल्याचेही नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)