...तर नियमित सभासद बनू शकत नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये २०१९ च्या कायद्यातील सुधारणेनंतर 'नाममात्र सभासदत्व' संपुष्टात आले असले तरी पूर्वीचे नाममात्र सभासद आपोआप नियमित सभासद बनू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला.
...तर नियमित सभासद बनू शकत नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
...तर नियमित सभासद बनू शकत नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय संग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये २०१९ च्या कायद्यातील सुधारणेनंतर 'नाममात्र सभासदत्व' संपुष्टात आले असले तरी पूर्वीचे नाममात्र सभासद आपोआप नियमित सभासद बनू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने ‘वैतरणा भीमा वरळी सागर सहकारी गृहनिर्माण संस्थेने’ दाखल केलेल्या १० याचिका मंजूर करत उपनिबंधक आणि विभागीय सहनिबंधकांचे आदेश रद्द ठरवले.

वरळीच्या पोचखानवाला रोडवरील शासकीय जमीन ‘वरळी सागर सोसायटी’ला लीजवर देण्यात आली होती. शासनाच्या नियमानुसार या इमारतीमध्ये केवळ निवासी सदनिका बांधायच्या होत्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र व्यक्तींनाच सभासद करून घ्यायचे होते. मात्र, नंतर शासनाने इमारतीत १५ टक्के चटईक्षेत्र दुकानांसाठी वापरण्याची परवानगी दिली. त्यामध्ये ५३ दुकाने बांधली. या दुकानाच्या गाळेधारकांना संस्थेने केवळ ‘नाममात्र सभासदत्व’ दिले होते.

या प्रकरणातील प्रतिवादी प्रोवेस फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीने २०१७ मध्ये इमारतीतील १० दुकानांचे गाळे कायदेशीर अटींनुसार नाममात्र सभासद म्हणून ताब्यात घेतले होते. संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, प्रतिवादी कंपनीने मूळ अलॉटीसोबत परस्पर 'डीड ऑफ कन्फर्मेशन/ट्रान्सफर' तयार केले. त्या आधारे संस्थेकडे अर्ज न करता थेट उपनिबंधकांकडे धाव घेतली. उपनिबंधकांनी जूनमध्ये प्रतिवादी कंपनीला दुकानांचे मालक गृहीत धरून नियमित सभासदत्व देण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाला विभागीय सहनिबंधकांनीही मान्यता दिली होती. तथापि, न्या. मारणे यांनी दोघांचेही आदेश रद्द केले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)