

मुंबई : एखाद्या घराच्या किंवा जमिनीच्या विक्री करारात व्यवहार पूर्ण करण्यासाठी ठराविक मुदत लिहिलेली असली, तरी 'वेळ हीच कराराची मुख्य अट आहे' असे मानून करार रद्द करता येत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. ४२ वर्षांहून अधिक काळ चाललेल्या कायदेशीर लढाईत न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.
मनमाड येथील चाळीतील घरात भाडेकरू म्हणून राहणारे मोहम्मद शेख यांनी १९७८ रोजी मालक तांबोळी यांच्याशी हा ब्लॉक १२,५०० रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता.
राखीव निकालावर निर्णय
मुदत संपण्यापूर्वीच खरेदीदाराने उर्वरित रक्कम देऊन खरेदी खत करण्याची तयारी दर्शवली. मात्र, मालकाने टाळाटाळ केली. अखेर खरेदीदाराने १९८४ मध्ये दिवाणी न्यायालयात दाद मागितली व उर्वरित रक्कम न्यायालयात जमा केली. १९ ऑक्टोबर १९८९ रोजी मनमाड येथील दिवाणी न्यायाधीशांनी खरेदीदाराच्या बाजूने निकाल देत विक्री कराराची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तथापि, १२ डिसेंबर २००२ रोजी मालेगावच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी तो निकाल रद्द केला होता. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर न्यायमूर्ती गाैरी गोडसे यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली आणि राखून ठेवलेला निकाल बुधवारी जाहीर केला. यामुळे मूळ भाडेकरूच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)