महिलेला काळ्या रंगावरून टोमणे मारणे छळ नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

एखाद्या महिलेला तिच्या काळ्या रंगावरून तसेच व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही म्हणून टोमणे मारणे हा छळ ठरत नाही.
मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयसंग्रहित छायाचित्र, पीटीआय
Published on

मुंबई : एखाद्या महिलेला तिच्या काळ्या रंगावरून तसेच व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही म्हणून टोमणे मारणे हा छळ ठरत नाही. अशाप्रकारचे टोमणे मारणे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ (छळवणूक) आणि कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि २७ वर्षांपूर्वीच्या जुन्या खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

सातारा जिल्ह्यातील महिलेने जानेवारी १९९८ मध्ये विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबाबानुसार, तिला पती वारंवार काळ्या रंगावरुन टोमणे मारायचा तसेच चांगले जेवण बनवत येत नसल्याच्या कारणावरुन वाद घालायचा. त्याच आरोपावरुन सातारा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती मोडक यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली.

मृत महिलेने तिला पती आणि सासरे त्रास देत असल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. तिचा काळा रंग आणि व्यवस्थित स्वयंपाक न करणे यावरुन वारंवार टोमणे मारत होते. मात्र अशाप्रकारचे वाद हे वैवाहिक जीवनातून उद्भवणारी भांडणे आहेत. याला घरगुती कलह म्हणता येईल. एखाद्याला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याइतपत याला गंभीर म्हणता येणार नाही, असे न्यायमूर्ती मोडक यांनी नमूद केले आणि आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

logo
marathi.freepressjournal.in