

मुंबई : कष्टाने कमावलेली बचत बँकांकडून परत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वारंवार न्यायालयात हेलपाटे मारायला लावू नका, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वित्तीय संस्थांनी वृद्ध ग्राहकांशी अधिक काळजी, संवेदनशीलता आणि सहानुभूतीने वागले पाहिजे, असा भरही न्यायालयाने दिला.
मुख्याधिकारी एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. ज्या संस्थांकडे आयुष्यभराची कष्टाची बचत ठेवलेली असते, अशा संस्थांविरुद्ध ज्येष्ठ नागरिकांना वारंवार न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागू नयेत. हा शेवटचा पर्याय आणि अपवाद असायला हवा, नियम नको, असे खंडपीठाने नमूद केले.
तांत्रिक बाबीत अडकवू नका!
कायद्याच्या चौकटीत राहून बँकांनी व्यावहारिक आणि मानवी दृष्टिकोन स्वीकारावा तसेच ज्येष्ठ नागरिकांना अनावश्यक कागदपत्रे, तांत्रिक बाबी आणि कार्यपद्धतीच्या अडचणीत अडकवू नये, असे खंडपीठाने तातडीने अधोरेखित केले. केवायसीसाठीही वृद्ध ग्राहकांना हेलपाटे मारायला लावले जातात, अशी नोंद घेतली.
ज्येष्ठांशी जपून वागा !
या प्रकरणाची हाताळणी ज्या पद्धतीने करण्यात आली, त्यावरून बँक आणि व्यवस्थापकीय संचालकांसह तिच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला होता. २० नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बँकेने पूर्ण आणि अंतिम तडजोड म्हणून १.४७ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. गुरुवारी बँकेने न्यायालयाला माहिती दिली की लागू कर कपातीनंतर ही रक्कम याचिकाकर्त्याच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. हा आदेश पूर्वलक्षी दाखला मानला जाणार नाही, असे स्पष्ट करताना बँका आणि वित्तीय संस्थांशी व्यवहार करताना ज्येष्ठ नागरिकांना त्रास आणि उदासीनतेचा सामना करावा लागल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याचे खंडपीठाने सांगितले.