
मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्तीसाठी सहा हजार कोटी रुपये खर्चून सिमेंट क्राँकिटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी २४२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. तरीही चार महिन्यांत मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले ६ हजार ४५ खड्डे १ एप्रिल ते २४ जुलैपर्यंत बुजवण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत.
संपूर्ण पश्चिम द्रूतगती महामार्गावर पावसाळापूर्व रस्ता दुरुस्तीचे झालेले काम कौतुकास्पद आहे. पूर्व द्रूतगती महामार्गावर विक्रोळी गोदरेज परिसरात काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे तातडीने पूर्ण करण्यात यावे, त्याचप्रमाणे पूर्व उन्नत द्रूतगती महामार्गावर काही ठिकाणी आढळलेले खड्डे वाहतूकीला अडथळा न होता लवकरात लवकर भरावेत, अशी सूचनाही या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रस्ते विभागाला केली.
खड्ड्यांच्या तक्रारीसाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲॅप, समाज माध्यमे, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. शासकीय प्राधिकरणांनीदेखील आपापल्या अखत्यारितील रस्त्यांचे योग्य परीक्षण करावे, खड्डे तातडीने बुजवले का, याचा पाठपुरावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे, अशी माहिती वेलरासू यांनी दिली आहे.
मुंबई महानगरात सुमारे २०५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी १ हजार ५८ किलोमीटर डांबरी तर ९९२ किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्या (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात.
२४ तासांत खड्डा बुजणार!
खड्ड्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो भरण्यासाठी ४८ तासांची मुदत असली तरी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे २४ तासाच्या आतमध्ये खड्डे भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ही पथके समन्वय साधतात. आतापर्यंत २४ प्रशासकीय विभागांना मिळून सुमारे ५१२ मेट्रिक टन ड्राय कोल्डमिक्स पुरवण्यात आले आहे.
येथे तक्रार करा!
ऑनलाइन पोर्टल/अॅप: MyBMCpotholefixit ॲप
आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक: १९१६
२४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र (CFC) व लेखी तक्रारी देणे
टोल फ्री दूरध्वनी क्रमांक: १८००२२१२९३
ट्विटर: @mybmcroads
बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: ९१-८९९९-२२-८९९९
एक हजार किमीचे रस्ते सिमेंट क्राँकिटचे!
मुंबईतील सुमारे १ हजार ५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आणखी ४०० किमीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रगतीपथावर आहे. तसेच सात परिमंडळातील खराब रस्त्यांच्या पृष्ठीकरणासाठी १२५ कोटी रूपयांची तरतूद पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.