‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरेंवर पलटवार

मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ‘बॉम्बे आयआयटी’ या नावावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली असून मराठी माणसाने सावध राहावे, असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत, ‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले.
‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरेंवर पलटवार
‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरेंवर पलटवार
Published on

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ‘बॉम्बे आयआयटी’च्या नावावरून वाद उफाळून आला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले असून मराठी माणसाने सावध व्हावे, असे आवाहन केले आहे. यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला असून ‘बॉम्बे’चे मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सर्वांना माहित आहे की, ‘बॉम्बे’चे नाव मुंबई करण्यामागे सर्वात मोठा वाटा भाजप नेते रामभाऊ नाईक यांचा आहे. आमच्याकरिता ‘बॉम्बे’ नाही, तर मुंबईच आहे. आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की, अशाप्रकारच्या बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत, त्या संपल्या पाहिजेत आणि त्याठिकाणी मुंबई आले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी वाद रंगू लागला आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी २४ नोव्हेंबरला ‘आयआयटी, मुंबई’च्या पी. सी. सक्सेना सभागृहातील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘आयआयटी’च्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले आणि त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश आहे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतला असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यावरून भाजपला निशाणा केले आहे.

लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही!

नगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू असून निवडणुकीत मतदारांकडे मतांचा जोगवा मागणे ही खरी लोकशाही आहे. लोकशाहीत घरी बसून राजकारण होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

सरकारी योजनांवर तिन्ही पक्षांचा हक्क

‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय केवळ एका पक्षाचे नसून ते संपूर्ण महायुतीचे आहे. सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत. स्थानिक पातळीवर काही नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या युत्या असू शकतात, पण सरकारच्या योजना या कोणत्याही एका पक्षाच्या नसून त्या तिन्ही पक्षांच्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘आयआयटी बॉम्बे’चे नाव बदलण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार - मुख्यमंत्री

‘बॉम्बे’च्या सर्व खुणा आता मिटल्या पाहिजेत, आमच्यासाठी ते ‘बॉम्बे’ नाही तर मुंबईच आहे. त्यामुळेच ‘आयआयटी बॉम्बे’चे नाव बदलून ‘आयआयटी मुंबई’ करावे, अशी मागणी करणारे पत्र मी स्वतः पंतप्रधान आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘काही लोक सोयीस्कर भूमिका घेतात, स्वतःच्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात (बॉम्बे स्कॉटिश), त्या शाळेचे नाव बदलण्याची मागणी मात्र करत नाहीत, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

आपले संविधान जगात सर्वोत्कृष्ट!

आपले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आवाज दिला असून, प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकवण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार दिला आहे, असे गौरवौद्गार फडणवीस यांनी काढले.

राज ठाकरे काय म्हणाले?

‘आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावरून भाजपची मानसिकता दिसून येते. मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याचा सल अजूनही कायम असल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे मराठी माणसाने सावध राहण्याची गरज आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in