पालिकेच्या केंद्रात ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण बोरिवली परिसरातील प्रत्यारोपण केंद्राचे उल्लेखनीय कार्य

आयुक्तांकडून शुभेच्छा तर अतिरिक्त आयुक्तांनी केले कौतुक
पालिकेच्या केंद्रात ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण बोरिवली परिसरातील प्रत्यारोपण केंद्राचे उल्लेखनीय कार्य

मुंबई : बोरिवली (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात तब्बल ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले आहे. अतिशय क्लिष्ट असलेले बोनमॅरो प्रत्यारोपण करून या केंद्राने मागील ५ वर्षात अशा अनेक बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत केली आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलासेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली.

रक्ताचा कर्करोग म्हणजे लुकेमीया आणि अनेक इतर कर्करोगांसाठी देखील या केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण व इतर संबंधित उपचार केले जातात. यानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक बालकांवर विविध स्तरीय उपचार करण्यात आले आहेत. बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या केंद्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईकर नागरिकांना अतिशय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेचे ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र’ अर्थात ‘सीटीसी, पीएचओ व बीएमटी उपचार केंद्र’ हे अविरतपणे कार्यरत आहे. नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. याचाच एक भाग म्हणून थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगानेग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ साली महानगरपालिकेने बोरिवली (पूर्व) परिसरात हे उपचार केंद्र सुरू केले. या केंद्रात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या केंद्रात दरवर्षी सुमारे ६० ते ८० प्रत्यारोपण केले जातात. यामध्ये 'अॅलोजेनिक' आणि 'ऑटोलॉगस' प्रत्यारोपण या दोन्हीं प्रक्रियांचा समावेश आहे. या केंद्रात डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे १६८ एवढे मनुष्यबळ कार्यरत आहेत, अशी माहितीही केंद्राद्वारे देण्यात आली आहे.

उपचार केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण निशुल्क

बोनमॅरो अनुरुप असल्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रूग्णालयात २५ ते ४० लाख रुपयांची आवश्यकता असते. परंतु, महानगरपालिकेच्या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात ही सुविधा निःशुल्क आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in