
इंधनाच्या वाढत्या किमती पाहता इलेक्िट्रक दुचाकीकडे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढत होता. पेट्रोलचे दर शंभरीपार झाल्यामुळे बऱ्याचशा शोरूममध्ये इलेक्टि्रक दुचाकीसाठी ग्राहकांकडून विचारणा केली जात होती. मात्र अलीकडे देशात ई-वाहनांना वारंवार आग लागण्याच्या आणि बॅटरीमध्ये स्फोट होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा ग्राहकांनी चांगलाच धसका घेतला असून मागील आठवड्याभरात मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील ३० टक्के ग्राहकांकडून ई-स्कूटरच्या बुकिंग रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
वाढते शहरीकरण आणि अत्यावश्यक गरज म्हणून दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी गेल्या काही वर्षांपासून वाढली आहे. अशातच वाढती महागाई आणि पेट्रोलचे गगनाला भिडणारे दर अशा दुहेरी कात्रीत सापडलेले सर्वसामान्य नागरिक प्रवासासाठी पर्याय म्हणून इलेक्िट्रक वाहनांकडे वळत आहेत. मागील वर्षभरात जवळपास १०० हून अधिक इलेक्िट्रक दुचाकींची विक्री करण्यात आली आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून देशातील विविध भागात इलेक्िट्रक स्कूटरला आग लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कंपन्यांना फॉल्टी स्कूटर रिकॉल करण्याचे आदेश दिले होते. तर जोपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरला का आग लागत आहे? याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन स्कूटर, बाईकचे लाँचिंग थांबविण्यास या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार सर्वत्र या गाड्यांचे उत्पादन तसेच विक्री थांबली आहे.
इलेक्िट्रक वाहनांच्या गुणवत्तेबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, त्यासोबतच निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करत भीतीपोटी बहुतांश शहरातील ग्राहकांनी ३ ते ४ महिने आधी केलेल्या बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत
मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरात सर्वाधिक ३० टक्के ग्राहकांकडून ई-स्कूटरच्या बुकिंग रद्द केल्याची माहिती वंश मोटर्सचे व्यवस्थापक अरुण लाल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे कारण?
देशातील जवळपास सर्वच इलेक्िट्रक दुचाकी आगीच्या घटनांमध्ये बॅटरी सेल किंवा डिझाइनमध्ये दोष आढळल्याचे चौकशी समितीचे म्हणणे आहे. ओकिनावा ऑटोटेक, बूम मोटर, प्युअर ईव्ही, जितेंद्र ईव्ही आणि ओला इलेक्िट्रक यांच्या ई-स्कूटर्समधील ईव्ही आग आणि बॅटरी स्फोटाच्या घटना लक्षात घेऊन स्थापन केलेल्या समितीने हा अहवाल दिला आहे. दरम्यान, ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधत उपाय सुचवणार आहेत.