आजपासून १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्यांना नाकावाटे कोरोना लसीचा बुस्टर डोस

कोविड लसीची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने उलटले ते बुस्टर डोस घेऊ शकतात
आजपासून १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्यांना नाकावाटे कोरोना लसीचा बुस्टर डोस
Published on

मुंबई : गेली तीन वर्षे थैमान घालणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. सद्यस्थितीत एक, दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून बुधवारपासून १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्‍यांना नाकावाटे इन्‍कोव्‍हॅक कोविड प्रतिबंधक लसीची प्रतिबंधात्‍मक मात्रा बुस्टर डोस देण्‍यास सुरुवात करण्‍यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे. दरम्यान, कोविड लसीची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने उलटले ते बुस्टर डोस घेऊ शकतात, असे ही त्या म्हणाल्या.

मुंबईतील प्रत्येक प्रशासकीय प्रत्येक २४ विभागात २४ लसीकरण केंद्रांवर २८ एप्रिल २०२३ पासून ६० वर्षावरील नागरिकांना तर २३ जून २०२३ पासून आरोग्‍य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणा-या कर्मचा-यांना नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक कोविड - १९ लसीची प्रतिबंधात्‍मक मात्रा अर्थात प्रिकॉशन / बूस्‍टर डोस देण्‍यात येत आहे.

राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनेनुसार, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे बुधवार १ नोव्‍हेंबर पासून इन्‍कोव्‍हॅक ही लस १८ ते ५९ वर्ष वयोगटातील लाभार्थ्‍यांना प्रिकॉशन / बूस्‍टर डोस म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीचा हा प्रिकॉशन / बूस्‍टर डोस घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रिकॉशन डोस म्हणून इन्‍कोव्‍हॅक लस देता येणार नसल्‍याचे देखील प्रशासनातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे. दरम्यान, संबंधित पात्र नागरिकांनी इन्‍कोव्‍हॅक लसीचा बूस्‍टर डोस घ्‍यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in