भटक्या कुत्र्यांना रेबीजचा 'बुस्टर डोस' ; संसर्ग रोखण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम

भटक्या कुत्र्यांना रेबीजचा 'बुस्टर डोस' ; संसर्ग रोखण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम

मुंबई रेबीज मुक्तीसाठी मुंबई महापालिका विशेष मोहीम राबवणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले

रेबीज आजार हा जीव घेणा असून, कुत्रे रेबीज आजारमुक्त करण्यासाठी पालिकेच्या देवनार पशुवधगृहाने विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेबीजचा डोस एकदा दिल्यावर वर्षभरात कुत्र्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना आता रेबीजचा डोस देण्याचे टार्गेट निश्चित केले आहे. आता वर्षभरात दुसऱ्यांदा रेबीजचा 'बुस्टर डोस' देण्यात येणार आहे. मुंबई रेबीज मुक्तीसाठी मुंबई महापालिका विशेष मोहीम राबवणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईत दरवर्षी २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत रेबीज मुक्त मोहीम राबवण्यात येते.

प्राण्याने विशेषतः कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज हा आजार होतो. हा आजार जीवघेणा असला, तरी वेळीच उपचार घेतल्यास रुग्णाचा जीव वाचला जाऊ शकतो. मुंबईत तीन लाखांहून अधिक कुत्रे आहेत. रेबीज आजार हा प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे 'रेबीज'. हा आजार अत्यंत जीवघेणा आहे. रेबीज आजार झाल्यानंतर वेळीच आणि योग्य उपचार मिळाले, तरच रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे जनावरांना विशेषतः कुत्र्यांना होणाऱ्या रेबीज आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

आजाराला १०० टक्के प्रतिबंध करणे उद्देश!

या मोहिमेअंतर्गत रेबीज आजाराचे १०० टक्के प्रतिबंध करणे आहे. या मोहिमेत मुंबई महापालिका हद्दीतील प्राणी प्रेमी नागरिक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राणी कल्याण संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद!

मुंबईसह देशात दरवर्षी सुमारे दीड कोटी लोकांना कुत्रे चावतात. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास रेबीज रोग होतो. या रेबीजमुळे दरवर्षी देशात २५ ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. या रोगाचा अंदाजे १.७ टक्के इतका प्रादुर्भाव आहे. तसेच, विशेष व धक्कादायक बाब म्हणजे देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होतो.

रेबीज आजारामुळे ३६ टक्के मृत्यू भारतात!

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच, जगभरात दरवर्षी ६० हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात, तर रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.

माणसांत रेबीज संसर्ग रोखते उद्दीष्ट

रेबीज आजार जीवघेणा ठरू शकतो. रेबीजची बाधा झालेला कुत्रा चावला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे माणसांत रेबीजचा संसर्ग पसरु नये यासाठी रेबीजचा डोस देण्यात येत आहे. परंतु रेबीजचा डोस दिलेल्या कुत्र्याची रोगप्रतिकारक शक्ती वर्षभरात कमी होते. त्यामुळे आता प्रत्येक विभागांत जाऊन रेबीजचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. ही मोहिम सायकलिंग सुरू राहणार असून, कुत्रा चावल्यानंतर माणसांत रेबीज संसर्ग पसरू नये हा मुख्य उद्देश आहे.

संस्थेची निवड

भटक्या कुत्र्यांना रेबीजचा डोस देण्यासाठी संस्थेची निवड करण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून रेबीज मुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे.

समज

-सर्व श्वान आणि मांजरींना रेबीज असतो.

-प्रौढ श्वान / मांजरींपेक्षा श्वानांच्या व मांजरींच्या पिल्लांना रेबीज होण्याची शक्यता जास्त असते.

-रेबीज टाळता येत नाही.

-पारंपारिक उपचार केल्याने श्वान चाव्यावर उपचार होऊ शकतात.

तथ्य

-श्वान आणि मांजरी नैसर्गिक रीत्या रेबीजसह जन्माला येत नाहीत. हा एक विषाणूजन्य रोग आहे, जो विषाणूने भरलेल्या लाळेच्या उतींमध्ये प्रवेश करुन पसरतो, सामान्यतः रेबीज ग्रस्त जनावरांच्या चाव्याद्वारे.

-लसीकरणाद्वारे श्वान व मांजरांमध्ये रेबीज अत्यंत प्रभावीपणे प्रतिबंधित करता येतो.

-श्वान / मांजर चावल्यास जखम ताबडतोब आणि पूर्णपणे धुवा आणि वैद्यकांकडून चावा पश्चात लसीकरण घ्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in