
मुंबई : मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील भूमिगत मार्ग, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प, पूल, रस्ते, महामार्ग आदी प्रकल्पांना बुस्टर मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आलेल्या ४ लाख ७ हजार कोटींचे सामंजस्य करार वांद्रे - कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबलच्या कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई महानगर क्षेत्रात दीड ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. युनिलिव्हर कंपनीसोबत झालेल्या करारामुळे पुण्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. पुणे शहरात मोठ्या संधी आहेत.
या करारामुळे या संधी मध्ये वाढ होऊन रोजगार निर्मिती सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे स्थान उंचावणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एमएमआरडीए आणि एचयूडीसीओ यांच्यामध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी दीड लाख कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच आरईसीसोबत एक लाख कोटी, पीएफसीसोबत एक लाख कोटी, आयआरएफसी (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत एक लाख कोटी आणि नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रकचर अँड डेव्हलपमेंट यांच्या सोबत ७ हजार कोटींचा असे एकूण ४ लाख ७ हजार कोटींचे करार करण्यात आले. युनिलिव्हर कंपनीच्या मॅग्नम आइस्क्रीम व्यापारासाठीचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर पुणे येथे उभारण्याचा सामंजस्य करार ही मंगळवारी करण्यात आला. या केंद्रामध्ये ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ५०० रोजगार उपलब्ध होणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हुडकोचे अध्यक्ष संजय कुलक्षेत्र, आरईसी आणि पीएफसीचे अध्यक्ष परमिंदर चोप्रा, आयआरएफसीचे संचालक शेली वर्मा, एनएबीएफआयडीचे व्यवस्थापकीय संचालक राजकीरण राय, मॅग्नम आइस्क्रीम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित भटाचार्य, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगम आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविले जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केले जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी नवनवीन संधी निर्माण करत आहोत. जागतिक पुरवठा साखळीसाठी सुविधा उपलब्ध करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. याशिवाय जगभरातील तसेच देशातील महत्वाच्या उद्योग कंपन्या महाराष्ट्रात आहेत. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करत असून त्यासाठी कौशल्य विद्यापीठ
कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, असेही मुख्यमंत्ऱ्यांनी सांगितले.
राज्यातील ग्रामीण भागावर लक्ष - फडणवीस
मुंबई महानगर प्रदेश बरोबरच राज्यातील ग्रामीण भागासह तर भागाच्या विकासावर लक्ष देण्यात येत आहे. पुण्यात ऑटोमोबाइल, छत्रपती संभाजी नगरमध्ये इलेक्ट्रिक वाहन उद्योग हब होत आहे. तसेच गडचिरोली जिल्हा हा देशातील नवीन स्टील हब म्हणून उदयास येत आहे, तर विदर्भात सोलर उत्पादन क्षेत्र वाढत आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे १५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना, उद्योजकांना लाभ होणार आहे. नवीन प्रस्तावित शक्तिपीठ मार्गामुळे मराठवाड्याचा फायदा होणार आहे. शिर्डी, पुणे, नागपूर येथे विमानतळाचे काम सुरू आहे. तर दुष्काळ मुक्तीसाठी सुमारे तीन लाख कोटींचे चार नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून विदर्भात कॅनॉलने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
...म्हणून एमएमआरचे महत्त्वाचे योगदान - मुख्यमंत्री
महाराष्ट्राला तीन ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्था करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाचे मोठे योगदान असणार आहे. एकट्या एमएमआर क्षेत्रात १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याची क्षमता आहे. त्यामुळे या भागावर जास्त फोकस आहे. मुंबई ही फिनटेक कॅपिटल असून नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार करत आहोत. या ठिकाणी एज्युसिटी, इनोव्हेशन सिटी निर्माण होत आहे. एज्युसिटी मध्ये जगातील सर्वात मोठे विद्यापीठ येण्यास उत्सुक असून ५ विद्यापीठे अंतिम होत आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार असून अटल सेतूमुळे विमानतळ व परिसराशी कनेटिव्हिटी वाढली आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.