मुंबई- बोरिवली परिसरात राहणार्या शिक्षिकेची अज्ञात सायबर ठगाने टास्कच्या माध्यमातून साडेसात लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. बोरिवली येथे राहणारी तक्रारदार महिला शिक्षिका आहे. गेल्या महिन्यांत तिला एक मॅसेज आला होता.
या मॅसेजमध्ये अज्ञात व्यक्तीने पार्टटाईम जॉब ऑफर करुन टास्कद्वारे जास्तीत जास्त कमिशन मिळविण्याची संधी असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने दिलेली ऑफर चांगली वाटल्याने तिने त्यास होकार दिला होता. त्यानंतर तिला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करुन तिथे तिला प्रोडक्ट लाईक करण्याचे टास्क देण्यात आले होते. सुरुवातीला या टास्कवर चांगले कमिशन मिळत होते.
मात्र नंतर प्रत्येक टास्कसाठी तिला काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.जास्त कमिशनच्या नादात तिने विविध प्रिपेड टास्कसाठी ७ लाख ५२ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र गुंतवणुक रक्कमेसह कमिशनची रक्कम न मिळाल्याने तिने संबंधित व्यक्तीला संपर्क साधला. त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांनी त्याने तिच्याशी चॅटींग करणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.