
मुंबई : विविध प्रजातींच्या पशुपक्षांची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात भेट देतात. मात्र राणी बागेत सहलीनिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राचे धडे दिले जातात. तर काही महाविद्यालयीन विद्यार्थी प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्राचा चिकित्सक अभ्यासही करत आहेत. त्यामुळे राणी बाग बच्चेकंपनीसह मोठ्यांसाठी मनोरंजन असली तरी येथे ज्ञानगंगा वाहत आहे. अभ्यास सहलीनिमित्त विद्यार्थ्यांचा किलबिलाट असतो.
मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, उपआयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या निर्देशानुसार भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात सतत विविध उपक्रम राबविण्यात येतात.
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानाविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी येथे येत असतात. काही विद्यार्थी वनस्पतीशास्त्राचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाची निवड करत आहेत. निसर्गसंपदा आणि विविध वनस्पतींच्या प्रजाती एकाच ठिकाणी अभ्यासाला मिळत असल्याने या विद्यार्थ्यांची अभ्यासविषयक रूची वाढत आहे. तीन महिन्यांपासून घाटकोपर येथील राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील वंदना यादव (एमएससी, वनस्पतिशास्त्र विभाग), कल्याण येथील बी. के. बिर्ला ऑटोनॉमस महाविद्यालयातील सायली राहतवाल आणि नक्षत्रा शिंदे (पर्यावरणशास्त्र विभाग) या विद्यार्थिनी उद्यानातील रोपांचे वर्गीकरण आणि ओळख, उद्यानातील रोपांचे संगोपन तसेच पक्ष्यांचे जीवनमान, झाडांचे महत्त्व आणि फुलपाखरे आदींचा अभ्यास करत आहेत. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि येथील अभ्यासक, अधिकारी, कर्मचारी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील अभ्यासक विद्यार्थीनी जुलिया कनेको हीसुद्धा उद्यानात आठ दिवसांसाठी अभ्यास दौऱ्यावर येवून गेली.
पहिल्याच सोमवारी उद्यानात किलबिलाट!
राणीबागेतील विविध प्रकारची झाडे, झुडपे, फुलझाडे, दुर्मिळ वनस्पती, देशी-परदेशी प्रजातीची फुले आणि फळझाडे आदींचा अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. साऊथ इंडियन इज्युकेशन सोसायटीच्या घाटकोपर आणि माटुंगा येथील दोन शाळेच्या एकूण १०० विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह सोमवारी बागेतील जपानी उद्यानाला भेट दिली. या उद्यानातील विविध रोपांची, झुडपांची, झाडांची माहिती जाणून घेतली. परदेशी यांनी विद्यार्थ्यांना उद्यानाविषयी, निरनिराळ्या फुलझाडांविषयी माहिती दिली.